पुणे । पुणे मेट्रोच्या कार्यक्षेत्रात बालेवाडीचा समावेश नसतानाही येथील 15 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मेट्रोच्या मार्गासाठी किंवा स्थानकासाठी नव्हे, तर या जागेवर व्यावसायिक संकुल उभारून त्याद्वारे निधी उभारण्याची शक्कल लढविली जाणार आहे. मेट्रोपाठोपाठ आता पीएमआरडीनेही आपल्या कार्यक्षेत्रात ही जागा येत असल्याने आपल्यालाच मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे.
पुणे मेट्रो आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण या दोघांनी या बालेवाडी येथील सरकारी 15 एकर जागेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, येथे दोन्ही मेट्रोचे स्थानक, डेपो अथवा मेट्रोसंदर्भातील कोणतेही बांधकाम करणार नाहीत. या सरकारी जागेवर पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलद्वारे व्यावासायिक संकुल उभे करून निधी उभारण्यात येणार आहे. या जागेसंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाला पाठविण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या वतीने मेट्रो कार डेपो, मेट्रो स्थानक, कर्मचार्यांसाठी निवासस्थान व कार्यालयांसाठी जागा आणि मेट्रो डेपोसाठी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय, शासकीय धान्य गोदाम, कोथरूड येथील शिवसृष्टीसाठी राखीव असलेली आणि बालेवाडी येथील जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोचा मार्ग अथवा कार्यक्षेत्र या भागात नसतानादेखील झपाट्यानेविकसित होत असल्याने बालेवाडी येथील जागेची मागणी केली आहे. पीएमआरडीए वतीने बालेवाडी येथील जागा आपल्या कार्यक्षेत्रात येत असून, भविष्यात या परिसरात मेट्रो येऊ शकते. ही जागा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. सध्या विकासकामांसाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने जागा विकसित करून निधी उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वापरात नसलेली जमीन काढून घेणार…
जिल्ह्यातील विविध संस्थांनी जमीन वापराच्या नियमांचे शर्तभंग केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक वर्षांपूर्वी अनेक संस्थांकडून जागा काढून घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेला बालेवाडी येथे 15 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले होते. या संस्थेने जागेचा वापरच न केल्याने ही जमीन काढून घेण्यात आली असून, पुन्हा सरकारजमा करण्यात आली आहे. तेव्हापासूनच या जागेवर डोळा आहे.