पिंपरी-चिंचवड । कर्ज देण्याच्या बहाण्याने एका फायनान्स कंपनीने डांगे चौकातील एका तरुणास ऑनलाईन पद्धतीने सुमारे दीड लाखाला गंडा घातला आहे. तर आणखी एका घटनेत एटीएम कार्ड बंद होत असल्याचे सांगून कार्डचा ओटीपी नंबर विचारून चिखलीतील एकाचे ऑनलाईन पद्धतीने खात्यातील 34 हजार काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अस्लम मुलाणी (वय 23, रा. डांगे चौक) या तरुणाने पशुपती फायनान्सकडे ऑनलाईन पद्धतीने 4 लाखाच्या कर्जाची मागणी केली. मात्र, कर्ज मंजूर करुन देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून बँकेच्या खात्यावर 1 लाख 63 हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, कर्ज दिले नाही. तर राजेश पार्टे (वय 43, रा. चिखली) यांची एका मेल आयडीवरुन बँकेतील खात्याची सर्व माहिती घेतली. तसेच एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगत कार्डचा ओटीपी क्रमांकही घेतला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 34 हजार 498 रुपयांची एका अनोळखी व्यक्तीने खरेदी केली. या प्रकरणी पिंपरी व वाकड पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.