बीड । बीड जिल्ह्यातील माजलगावजवळील टालेवाडी येथे वडिलांनी दोन मुलांची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुंदन वानखेडे असे या निर्दयी पित्याचे नाव आहे.
मुलांना जाळून मारल्यानंतर तो फरार झाला आहे. गुरुवारी सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. वैष्णव वानखेडे (वय 2) आणि बलभीम वानखेडे (वय 4) अशी या घटनेत मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. कुंदन हा शेतकरी आहे. कुंदन आणि त्याच्या पत्नीमध्ये काहीकारणास्तव वाद होते. त्यामुळे पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत होती. दोंघाच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. दोन दिवसांनी न्यायालयात वादा संदर्भात सुनावणी होणार होती. कुंदन आणि त्याच्या पत्नीतील वादामुळेच त्याने मुलांचा जीव घेतला, अशी चर्चा परिसरात रंगत आहे.