दोघांना फाशी, सालेमसह दोघांना जन्मठेप

0

1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला : सालेम म्हणतो महाराष्ट्रात जीवाला धोका!

मुंबई : विशेष टाडा न्यायालयाने 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षेसह दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणात सालेमसह करिमुल्ला खान, रियाझ सिद्दीकी, ताहिर मर्चंट, फिरोज अब्दुल रशीद खान यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. यामधील करिमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, रियाझ सिद्दीकीला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर ताहिर मर्चंट आणि फिरोज अब्दुल रशीद खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील सहावा आरोपी मुस्तफा डोसालादेखील न्यायालयाने दोषी ठरवले होते. परंतु, युक्तीवाद सुरु असताना डोसाचा मृत्यू झाला. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर अबू सालेमने महाराष्ट्रात माझ्या जीवाला धोका असल्याने महाराष्ट्राबाहेरील तुरुंगात मला पाठवावे. तसेच निकाह रजिस्टर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

दाऊद अजूनही फरार
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम हा अजूनही फरार आहे. बॉम्बस्फोट घडविल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अबू सालेम आणि मुस्तफा डोसा हे फरार झाले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील एका गुन्ह्यात 30 जुलै 2015 रोजी याकूब मेमन यास फाशी देण्यात आली होती.

257 मुंबईकर मृत्युमुखी पडले
1993 च्या बॉम्बस्फोटात 257 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 713 जण गंभीर जखमी झाले. 27 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. 2007 मध्ये याप्रकरणी सुनावणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी याकूब मेमनसह 100 आरोपींना दोषी ठरवले होते तर 23 जणांना आरोपातून मुक्त केले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणी 27 आरोपी अद्याप फरार आहेत. मुस्तफा दोसा, टायगर मेमन आणि छोटा शकील यांनी पाकिस्तानात ट्रेनिंग कॅम्प घेतले होते. हत्यारांच्या ट्रेनिंगसाठी सर्व हल्लेखोरांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. स्फोटांपूर्वी दुबई आणि इतर ठिकाणी 15 बैठका घेण्यात आल्या होत्या.

सर्वांना समान शिक्षा हवी होती : किर्ती अजमेरा
1993 चा बॉम्बस्फोटाची प्रत्यक्षदर्शी किर्ती अजमेरा यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटाच्या यातना मी अजूनही सहन करतेय. 1993 पासून आतापर्यंत माझ्यावर 40 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अजूनही माझ्या शरीरात काचांचे तुकडे आहेत. या गुन्ह्यातील आरोपींची शिक्षा मागील दोन वर्षांपासून टळत होती. न्यायालयाने सर्वांना समान शिक्षा द्यायला हवी होती. आजही आमची अवस्था गंभीर आहे. जेव्हा राजकीय फायदा असतो तेव्हाच लोकांना आमची आठवण येते. या गुन्ह्याशी संबंधीत अन्य प्रकरणांचीही राज्य सरकारने तातडीने दखल घ्यायला हवी.

अबू सालेवरील आरोप
गुजरातहून मुंबईत शस्त्र आणल्याचा आरोप सालेमवर होता. या प्रकरणात हा आरोप सिद्ध झाला. सालेमने यापैकी काही शस्त्र अभिनेता संजय दत्त याच्याकडे ठेवल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी ही हत्यारे 18 जानेवारी 1993 रोजी संजय दत्तच्या घरातून जप्त केली होती. सालेमवर भारतात डझनभर गुन्हे दाखल आहेत. 1995 मध्ये मुंबईत बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांचा खून झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने सालेमला फेब्रुवारी 2015 ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सालेमला अभिनेत्री मोनिका बेदीसह पोर्तुगालमध्ये पकडण्यात आले होते. त्यास फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर पोर्तुगाल सरकाने सालेमचे प्रत्यार्पण केले होते. मोनिका बेदीला भोपाळमध्ये बनविलेल्या खोट्या पासपोर्टप्रकरणात अटक करण्यात आले होते.

अबू सालेम – जन्मठेप
करिमुल्ला खान – जन्मठेप
फरोज अब्दुल रशीद खान – फाशी
ताहिर मर्चंट – फाशी
रियाझ सिद्दीकी – 10 वर्षांची शिक्षा

न्यायालयात काय घडले
-न्यायाधीश शिक्षा सुनावत असताना अबू सालेम शांत उभा होता.
-शिक्षा सुनावताच सालेम न्यायालयातील बाकड्यावर बसला.
-तर जन्मठेप सुनावताच करिमुल्ला खान रडू लागला.
-निर्णय ऐकण्यासाठी न्यायालयात तुडुंब गर्दी होती.