दोघा दहशतवाद्यांना काश्मिरात संपवले

0

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या एका छोट्या धुमश्‍चक्रीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोघा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. दक्षिण काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांच्या तिघा वरिष्ठ अधिकार्‍यांना घातपात करण्याच्या प्रयत्नात असताना या दहशतवांद्यांना मारण्यात आले तर त्यांचा एक सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला. या दोघांकडून एक एसएलआर आणि एके 47 मशीनगन जप्त करण्यात आली.

पुलवामाचे पोलीस अधिक्षक रईस अहमद, अवंतीपुराचे पोलीस अधिक्षक जाहिद मलिक आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंदन कोहली यांचा ताफा सीमेजवळील भागात जात असताना हा प्रकार घडला. यावेळी दहशतवाद्यांनी पाठीमागून येत चंदन कोहली यांच्या गाडीवर गोळीबार चालू केला. या गोळीबाराला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे दोन दहशतवादी मारले गेले. दक्षिण काश्मिरचे पोलीस उपमहासंचालक एस. पानी यांनी सांगितले की, मारल्या गेलेल्या दोघा दहशतवाद्यांकडून दोन हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही.