भुसावळ । पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या उद्घाटन निमित्ताने का होईना भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील व भाजपाचे आमदार तथा माजी पालकमंत्री संजय सावकारे भुसावळात एकाच व्यासपीठावर आले. तीनही मान्यवरांनी आपल्या भाषणातून आपल्या व्यक्तीमत्वाची छाप तर सोडलीच मात्र भुसावळच्या गुन्हेगारीवर बोट ठेवत एका तिरातून दोन निशाणे गाठले. आजी-माजी मंत्र्यांच्या भाषणातील जुगलबंदीचे उपस्थित मान्यवरांसह नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले.
व्हाईट कॉलरही पकडले जातील – सावकारे
माजी मंत्री तथा आमदार संजय सावकारे म्हणाले की, पोलीस ठाणे म्हटले म्हणजे दाटी-वाटीने बसलेले पोलीस, कोंदट वातावरण सर्वत्र नजरेस पडते या नवीन इमारतीत मात्र प्रसन्न वातावरण पाहून गुन्हेगारांना चांगले वाटेल शिवाय अजून ‘चांगले’ (कुणाचाही नामोल्लेख न करता) गुन्हेगार पकडले जातील. आम्ही त्यांना पुढे पाठवून देऊ त्यासाठी वाढीव बजेट आम्ही मंजूर करून घेतले आहे, असे सांगताच हास्याचे फवारे उमटले. तालुक्यातील लोकांना या इमारतीचा जास्त उपयोग होवू नये या वाक्यानेही उपस्थितांना गुदगुल्या झाल्या. आरटीओ कार्यालयासाठी जागा मंजूर असून सकारात्मक अभिप्राय मंत्रालयात पाठवण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली.
शहर सर्वच बाबीत जंक्शन -पाटील
सहकार मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भुसावळ हे सर्वच बाबतीतले जंक्शन आहे त्यामुळे आमचा रेल्वेनिमित्ताने भुसावळशी तसा नेहमीच संपर्क राहतो. कर्तव्यदक्ष अधिकारी असला म्हणजे आरोपी पोलीस ठाण्यात येणार नाही, असे सांगत गुन्हेगारांसाठी पोलीस कोठडी हवेशीर असल्याची कोटी त्यांनी केली.
पोलिसांचा पट्टा रोखेल गुन्हेगारी -महाजन
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबरावांच्या पोलीस कोठडीचा धागा पकडत (त्यांच्याकडे पाहत) लॉकअपची पाहणी केली त्यावेळी शेजारी एक पट्टादेखील पडला होता, असे सांगत त्यामुळे गुन्हेगार पुन्हा येथे येणार नाही, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. जंक्शन शहरामुळे राज्या-परराज्यातील गुन्हेगार येथे येतात
त्यामुळे पोलिसांनी सतर्क रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.