जळगाव : नोटाबंदीनंतर चलनातील जुन्या नोटा बदलून देण्याच्या आमिष दाखवून व्यावसायिकाची 24 लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी दोघा संशयीतांना अटक केली होती. आज या गुन्ह्यातील महिला संशयीतास अटक करण्यात आली असुन संशयीतांना पुन्हा न्यायालयाने दोन दिवसांच्या कोठडीत रवाना केले आहे. भादली येथील रहिवासी तथा बांधकाम आणि इस्टेट एजंट राजेश हेमराज सराफ यांचे भुसावळ येथील प्लॉट विक्री झाल्यानंतर 30 लाखांची रोकड जमा झाली होती. जुन्या बंद झालेल्या नोटा बँकेत जमा करून हातोहात नव्या नोटा मिळवून देण्याचे आमिष देत चंद्रशेखर कृष्णा चौधरी (रा. भादली) याने त्याचा जळगाव जनता सहकारी बँकेतील नातेवाईक सुनील रामू जंगले (वय 47, रा. मोहननगर) याच्याशी नोट बदलून देण्यासाठी ओळख करून दिली. सराफ यांनी ठरल्याप्रमाणे कमिशन कापून 30 लाख रुपयांचे जुने चलन देत बदलून देण्यास सांगितले. मात्र, बरेच दिवस उलटून केवळ 6 लाख परत केले. मात्र, उरलेली रक्कम परत न केल्याने सराफ यांनी फिर्याद दिल्याने शुक्रवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चंद्रशेखर चौधरीसह त्याची पत्नी चंद्रलेखा व सुनील जंगले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यातील सुनील जंगले याला पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली होती. काल चंद्रशेखर व आज चंद्रलेखा या पतिपत्नीला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्या.के.एस.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता अटकेतील तिघा संशयीतांना पुन्हा दोन दिवसांच्या कोठडीत रवाना केले आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. हेमंत मेंडकी, बचावपक्षातर्फे ऍड.प्रमोद बडगुजर, फिर्यादीतर्फे ऍड. गोविंद तिवारी यांनी कामकाज पाहिले.