दोघे बहीण-भाऊ; उद्याला मोठाले होऊ

0

श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन! बहीण-भावाचा पवित्र सण म्हणजे बहीण भावाला ओवाळून भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. त्याच्या मोबदल्यात भावाकडून बहिणीला कोणत्याही गोष्टींची अपेक्षा नसते. मात्र, त्याने असो वा नसो पण त्याने बहिणीच्या सुख-दुःखात शेवटपर्यंत साथ द्यावी एवढीच अपेक्षा. आज आम्ही मोठे झालो आहोत आणि आपापल्या इवल्याशा कुटुंबात रमलो आहोत. त्यामुळे आम्ही बहीण-भावांची भेट सहा महिन्यांतून अथवा वर्षातून होत असते, बाई (माझी लहान बहीण) आम्हा दोघां भावांना बांधण्यासाठी अगदी लवकर तयारी करून ओवाळून राखी बांधायची. आम्ही दोघांनी पाच-पाच रुपये तिला दिल्यानंतर तिच्या मनाला खूप आनंद होत होता आणि तो चेहर्‍यावरून स्पष्ट दिसून यायचा.

असो! सकाळी आमच्या सौंची लवकर उठून, स्वत:च आवरून झाल्यावर दोन्ही मुलांना अंघोळ घालण्याची तयारी सुरू. कारण, नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन! मी झोपेतच असताना ती मुलांना सांगायला लागली, दीदी(त्रिशा) आज रक्षाबंधन आहे, तू दादूला (अथर्व) ओवाळशील ना?. त्यावर दीदीने ताडकन लगेच उत्साहात हो म्हटले. त्यावर दादूची नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया आलीच, मी पण बांधीन…त्याच्या बोलण्याकडे दीदीचे चांगलेच लक्ष होते. अरे…, राखी मी तुला बांधणार आहे ती म्हटली. दीदीने घागरा चुनरीचा ड्रेस घालणार असल्याचे मला सांगितले. पप्पा, मला दादूला राखी बांधायची आहे, माझी तयारी करून द्याल का?. त्यावर दादूसुद्धा मी पण करणार. आमच्या सौंचा एक तासानंतर पूजा-अर्चाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रक्षाबंधननिमित्त ओवाळण्याची तयारी सुरू झाली. दीदी आणि दादू दोघे अगदी नटूनथटून तयार झाले. दीदी ओवाळणीचे घेऊन त्याची पूजा करण्यासाठी आली तर भाऊ राखी बांधायला तयार नाही. त्याचे लक्ष होते ते सत्यनारायणात पूजा करताना देवासमोर ठेवलेला रव्याचा शिरा आणि खडीसाखर!, ते त्याला हवे होते. त्यामुळे तो मधूनमधून त्या शिर्‍याकडे टवकारत होता. इकडे त्याच्या हातावर राखी बांधायला चाललेली बहिणीची धडपड, तो बांधायला नाही म्हणायचा, खाऊ दे, शेवटी त्याच्या हातात खाऊ ठेवला आणि त्याने राखी बांधण्यास हात पुढे केला; हे सर्व सुरू असताना मला लहानपणी असाच 22 वर्षांपूर्वीचा एक किस्सा आठवला. आईने तीन राख्या घेतल्या. दोन राख्या आम्हाला आणि एक राखी वडिलांसाठी. तिने बांधल्यानंतर आम्ही राखी बांधण्यासाठी एका रांगेत बसलो, तेवढ्यात मात्र बाई आम्हाला राखी बांधायला तयार नव्हती, तिच्या मनात काय चाललंय, हे आम्हाला काहीच समजलं नाही. त्यावर आई ओरडली काव दोन्ही भाऊस्ले राखी बांध ना…, मोठं व्हयनात की एकमेकले सौउसौउ महिना तोंड दिखाव नहीं तुम्हले शेवटी तिने आईच्या सांगण्यावरून राखी खरंच आईने सांगितलेले ते शब्द मला आठवले. हे दोघेसुद्धा मोठे होतील आणि आपल्या आठवणींना केव्हातरी उजाळा देतील. डिजिटलच्या युगात आपण वावरत असल्यामुळे त्यांचे दोघांचे फोटो आणि सेल्फी काढून घेतला. दोघे मोठे झाल्यावर लहान भावाला तिने राखी बांधली. याबाबत तिला आठवण येऊन कदाचित माझ्याप्रमाणे तिचेही डोळे पाणावलेले असतील.
जितेंद्र कोतवाल – 9730576840