शिंदखेडा । शहरातील भाजी मंडई व शॉपींग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचे एकदा नव्हे तर दोनदा भुमीपूजन होवूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते सुनील बाजीराव चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्यांना निवेदन देवून त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला आहे.
…काम तातडीने सुरु करावे
या निवेदनात म्हटले आहे की, सहा महिन्यांपूर्वी शहरातील शिवाजी चौकात भाजी मंडईसह शॉपींग कॉम्प्लेक्सच्या कामाला नगरपरिषदेने मंजुरी दिली. 21 ऑगस्ट 2017 रोजी वर्कऑर्डरही काढली. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2017 रोजी माजी नगराध्यक्षांनी तर 9 एप्रिल 2018 रोजी पर्रटनमंत्री जयकुमार रावल यांनी या बांधकामाचे भुमीपूजन केले. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालीच नाही. भाजी मंडई व शॉपींग कॉम्प्लेक्सच्या जागेवर अतिक्रमण आणि वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर असल्याने काम होत नसल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी फक्त दोनच लोकांचे अतिक्रमण राहिले असून ट्रान्सफार्मरची जागा बदलण्याबाबत वीज वितरण कंपनीने तजबीज केली आहे. असे असतांना केवळ नगरपरिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकार्यांमुळे या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. नगरपरिषदेच्या अधिकारी पदाधिकार्यांनी दोघा अतिक्रमणधारकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करुन जागा खाली करुन घ्यावी व भाजी मार्केटसह शॉपींग कॉम्प्लेक्सचे काम तातडीने सुरु करावे, अन्यथा काँग्रेस पक्षाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल. असा इशारा या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर गटनेते सुनील चौधरी यांच्यासह प्रतोद दीपक दशरथ भील (अहिरे), नगरसेवक उदय अरुण देसले, नगरसेविका मीरा मनोहर पाटील, संगिता चंद्रकांत भील, संगिता किरण थोरात, स्विकृत नगरसेवक सुरज रविंद्र देसले यांची नावे आहेत.