जुन्नर । जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील नाणेघाट परिसरातील ऐतिहासिक किल्ले जीवधनजवळ असणार्या वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहनासाठी आलेल्या दोन गिर्यारोहकांपैकी एक पर्यटक दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवार सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. नशीब बलवत्तर म्हणून खोल दरीत कोसळूनही केवळ झाडाला अडकल्याने या गिर्यारोहकाचा जीव वाचविण्यात वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथकाला यश आले.
प्रा. कांबळे, हॉटेल चालकाच्या प्रसंगावधानाने जीव वाचविण्यात यश
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोर तालुक्यातील करंदी येथून प्रणय सावंत (वय 17,) व शरण सावंत (वय 22) हे दोन गिर्यारोहक सकाळी सात वाजता नाणेघाट येथील वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहनासाठी आले होते. वानरलिंगी सुळका चढण्यास सुरुवात केल्यानंतर पंधरा फूट अंतरावर गेल्यावर शरण सावंत याच्या हाताला वेदना होऊ लागल्यामुळे त्याचा हात निसटला व तो वानरलिंगी सुळक्याच्या पश्चिमेला जवळपास दोनशे फूट खोल दरीत कोसळला. यावेळी त्याचा भाऊ मदतीसाठी आरडाओरडा करू लागला. त्याने जुन्नर येथील त्याचा मित्र प्रा. गौरव कांबळे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क केला. तसेच हॉटेलचे चालक सुभाष आढारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने जुन्नर पोलीस स्टेशन ला संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला.
चार तास सुरू होते शर्थीचे प्रयत्न
गौरव कांबळे यांनी वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, वनरक्षक रमेश खरमाळे, घाटघर येथील सुभाष आढारी, नितीन शिंदे, हनुमंत भाल, सॅम पाडळे, एलेक्स मेंन्डोंसा, विलास रावते, विष्णू शिंदे, रोहीदास आढारी या बचाव पथकाने दोराचे स्ट्रेचर करून तब्बल चार तास प्रयत्न करून या युवकाला वाचविले. जखमी गिर्यारोहकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. बचाव पथकाचे ग्रामस्थ व पर्यटकांनी अभिनंदन केले.