दोनशे लाभार्थ्यांना मिळणार सौर कृषीपंप

0

धुळे । अटल सौर कृषी पंप योजनेत धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून 200 लाभार्थ्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना सौर कृषी पंपांचे लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सौर कृषी पंप आस्थापित करणेबाबत गठित समितीची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, महाऊर्जाचे विभागीय अधिकारी लक्ष्मीकांत गीते उपस्थित होते. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर स्वरुपाचा असून तो शेतकर्‍यांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे सौर कृषी पंप योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

10 एकर जमिनीची आवश्यकता
अधीक्षक अभियंता सरग यांनी सांगितले, राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना सिंचनासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळद्वारा प्रमाणित जैन एरीगेशन सिस्टिमकडून पंप पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी एमएसईडीसीएलकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकर्‍यांच्या शेत जमिनीचे क्षेत्र 10 एकर असणे आवश्यक आहे. धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. सौर कृषी पंपाच्या लाभासाठी प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.