दोन्ही बहिणींचा विहीरीत पडून मृत्यू

0

धुळे । धुळे तालुक्यातील वडेल शिवारात कामासाठी आई-वडीलांसह शेतात गेलेल्या दोन सख्या बहिणींचा खेळत असताना विहीरीत पाय घसरुन विहीरीत पडल्या. त्यात त्यांचा मृत झाल्याची घटना सोमवारी 19 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास वडेल येथे घडली. शेती कामाला जोर आल्याने कुटुंबीय हे लहान मुलांना सोबत घेऊन शेती कामासाठी जात आहे. रत्ना अर्जुन हाके (7) व शीतल अर्जुन हाके (5) या दोन्ही बहिणींचा या घटनेत मृत्यु झाला आहे. दोन सख्या बहिणींचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेने वडेल परिसरात शोक पसरला आहे. मृत्यदेह तळाशी गेल्याने शोधतांना खुप कसरत करावी लागली. दुपार पर्यत मृत्यदेह आढळून आले नाही.

कापसाची निंदणी सुरु
याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील वडेल गावात राहणारे अर्जुन हाके यांचे गावातील शिवारातच शेत आहे. सोमवारी सकाळी अर्जुन यांच्या पत्नी भागाबाई या रत्ना व शीतल दोन्ही मुलींसोबत शेतात गेल्या होत्या. त्यावेळी भागाबाई या शेतात कापसाची निंदणीचे काम करत होत्या. त्याच वेळी त्यांच्या दोघी मुली विहीरीजवळ खेळत होत्या. दुर्देवाने त्यांचा पाय निसटल्याने त्या विहिरीत पडल्या.

आईचा वाचविण्याचा प्रयत्न फोल
खेळता-खेळात दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या ही घटना शेतात काम करत असलेल्या भागाबाई यांचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या हातातील काम बाजूला ठेऊन विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या दोन्ही चिमुरड्या मुली या विहिरीतील पाण्यात गटांगळ्या खात होत्या. त्यांना पोहता येत नसतांना देखील त्यांनी जीवाची पर्वा न करता व इतराकडून मदतीची अपेक्षा न करता आईने विहीरीत उडी घेतली. परंतु, त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठेवले. हा प्रकार घडल्यानंतर शेतात काम करत असलेले समाधान शिवराम हाके यांनी विहिरीजवळ भागाबाई व त्यांच्या दोन्ही मुली पडल्याचे पाहून आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी
त्याचवेळी गावातील नाना नामदेव माने हेदेखील तेथे पोहचले. त्यांनी विलंब न करता विहिरीत उडी मारली. पाण्यात उतरल्यानंतर त्यांनी भागाबाई यांना वाचवले. सकाळी नऊ वाजता रत्ना अर्जुन हाके हिचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. शीतलला शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु ती विहिरीतील पाण्यात आढळून आली नाही. विहिरीच्या अगदी तळाशी ती गेली होती. त्यामुळे दुपारी तीन वाजता तिचा मृतदेह काढण्यात यश आले.