अमळनेर । दहावी परिक्षेचा शेवटचा पेपर देऊन दहिवद येथून अमळनेरकडे निघालेल्या तीन जणांची मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एक तरुणी जागीच ठार तर दोन तरुण जखमी झाल्याची घटना अमळनेर तालुक्यात नगाव ते देवळी फाटादरम्यान आज दुपारी घडली. मात्र हा घातपात आहे की अपघात, हे स्पष्ट झाले नाही.
दोन तरुण जखमी
ज्योती दशरथ मालकेकर (वय 20, रा नरडाणा) दहावीचा पेपर देण्यासाठी दहीवद परिक्षा केंद्रावर गेली होती परिक्षा संपल्यावर ती इस्माईल युसूफ मेहतर व नाझिम हानिफ मेहतर यांच्यासोबत गडखांबमार्गे मोटारसायकल (क्र एम एच 19 आर 9947 )ने जात असतांना नगाव शिवारातील नानागीर गोसावी यांच्या शेताजवळ पीक अप जीपगाडीला ओव्हरटेक करतांना मोटरसायकल स्लीप झाल्याने तिघे रस्त्यावर पडले होते त्याचवेळी पाठीमागून येणार्या धुळे -चोपडा बस (क्र एम एच 20 बी एल 2401) चा पत्रा लागल्याने डोक्याला जखम होऊन ज्योती जागीच ठार झाली इस्माईल मेहतर व नाझिम मेहतर हे जखमी झाले. ज्योतीने टाकरखेड्याच्या माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला होता ती नरडाना येथून परीक्षा देण्यासाठी अमळनेर येथे रेल्वेने ये-जा करत होती आज शेवटचा पेपर आटोपून ती रेल्वेने नरडाना जाणार होती परंतु ही दुर्घटना घडली तिच्या पश्चात वडील, दोन भाऊ, 3 विवाहित बहिणी असा परिवार आहे ज्योतीचे औरंगाबाद येथे लग्न ठरले होते याबाबत पोलिसांकडून मात्र, माहिती मिळू शकली नाही त्यामुळे हा अपघात आहे की घातपात आहे हे लगेच स्पष्ट झाले नाही.
भरधाव ट्रकची इंडिगोला धडक; जाडगाव फाट्याजवळील घटना
वरणगाव । महामार्गावर भरधाव ट्रकने इंडिगोला धडक दिल्याने दोन जण ठार, 4 जण जखमी झाल्याची घटना जाडगाव फाट्यावर मध्यरात्री घडली. ट्रकचालकाविरुध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत दैव बलवत्तर असलेली 9 महिन्यांची बालिका बचावली. जिल्हा स्काऊट गाईड संघटन अधिकारी आठोले यांचे लग्न आटोपून अकोला येथून परतीचा प्रवास इंडिगो गाडीने करीत असतांना कर्मचार्यांवर जाडगाव फाट्याजवळ काळाने झडप घातली.
जखमी जळगावच्या रुग्णालयांमध्ये
भुसावळकडून वरणगावकडे येणारा ट्रक (क्र. डब्ल्यूबी 23 डी 4298) ने समोरून येणारी टाटा इंडिगो (क्र. एमएच 19 ए एक्स 585 ) ला धडक दिल्याने चालक सुधीर शांताराम सोनवणे (वय 43 रा- दादावाडी, जळगाव), गणेश अभिमन्यू फुलपगारे (वय 37 रा- भोई सोसायटी, धुळे, ह.मु. पिंप्राळा, जळगाव) दोघे जण जागीच ठार झाले तर सिमा मनोहर भगत (वय 35) ही गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे शाम भोलाणे, गिरीश तायडे, प्रथमेश गणेश फुलपगारे (वय 12) यांच्यावरही जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांनी मृतकांचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रविंद्र शांताराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालक फरार आहे. ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. तपास पीएसआय निलेश वाघ, हेकॉ जितेंद्र नारेकर, मजर पठाण करीत आहे. इंडिगो गाडीला झालेला अपघातात दोन जण ठार, महिला गंभीर तर तीन जण जखमी झाले असून सिमा भगत हिची नऊ महिन्यांची बालिका सुहा ही दुर्देवी घटनेतून सुदैवाने बालंबाल बचावली असून देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यय आला आहे.