श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील हिमालयाच्या पर्वतराजीत असलेल्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेत नैसर्गिक कारणांनी दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला aआहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता १४ झाली आहे. हैदराबाद येथील लक्ष्मीबाई (५४) यांचा बालताल तळावर हृदयविकाराने मृत्यू झाला. गंदेरबाल जिल्ह्य़ात काल ही घटना झाली. त्यांचा मृतदेह तेथील रुग्णालयात नेण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे रवींदर नाथ (वय ७२) यांचाही आजारी पडून मृत्यू झाला. त्यांना सौरा येथे एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा रुग्णालयात आज मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग व काश्मीरला उर्वरित देशाशी जोडणारा मुघल मार्ग या दोन्ही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आल्याने अमरनाथ यात्रेकरूंसह अनेक जण अडकून पडले आहेत. पोलिस महासंचालक एस. पी. वेद यांनी सांगितले, की अमरनाथ यात्रेच्या वेळीच फुटीरतावाद्यांनी हिज्बुलचा कमांडर बुरहानी वानी मारला गेल्याच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बंदचे आवाहन केले आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत.
भगवती नगर तळावरून कुणाही यात्रेकरूला पुढे सोडण्यात आलेले नाही. अनेक लोकांना जम्मू-श्रीनगर मार्गावर अडवण्यात आले आहे. अमरनाथ यात्रा एक दिवसासाठी थांबवण्यात आली असून यात्रेकरूंनी सहकार्य करावे असे सांगण्यात आले. ६० दिवसांची यात्रा २८ जूनला सुरू झाली असून अनेकदा खराब हवामानामुळे ती थांबवावी लागली. आतापर्यंत ८३,१३० यात्रेकरूंनी दर्शन घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून वीस हजार यात्रेकरू देशातून येथे आले असून त्यातील अनेक जण अडकून पडले आहेत. मुघल रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली असून राजौरी व पूँछ जिल्ह्य़ांना दक्षिण काश्मीरमधील शोपियॉ जिल्ह्य़ाशी जोडणारा हा पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे जम्मू व दक्षिण काश्मीरचा संपर्क तुटला आहे.