श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेस साई पालखी निवारा,निघोज या ठिकाणी राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय.ए.एस.अॅकॅडमी सुरु करण्यासाठी श्री.काशिनाथ गोविंद पाटील रा.कोपरी, ता.वसई,जि.पालघर यांनी त्यांचे मालकीच्या एकूण ९७८२.४४ चौमी. सुमारे ३२ कोटी रुपये किंमतीच्या बांधीव क्षेत्र असलेल्या दोन इमारती संस्थानला आज देणगी दाखल दिल्याची माहीती संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या दि.२२ डिसेंबर २०१६ रोजीच्या संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत श्री.काशिनाथ गोविंद पाटील, रा.कोपरी, ता.वसई, जि.पालघर यांचे मौजे निघोज, ता.राहाता येथील गट नं.१७७, १७८, २८२/१, २८४ व २८८/६ मधील भूखंड क्रं.१ मधील इमारत बी व डी विनामोबदला हस्तांतर करणेस व या इमारतींमध्ये राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करुन त्यांना प्रशासकीय सेवेचा लाभ मिळवून देणेकामी निवृत्त राजपत्रित अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली आय.ए.एस. अॅकॅडमी सुरु करणेस मान्यता देण्यात आलेली आहे. या सभेस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम,विश्वस्त सर्वश्री सचिन तांबे,मोहन जयकर,प्रताप भोसले,भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्हे,तत्कालीन विश्वस्त अनिताताई जगताप हे उपस्थित होते.
आज रोजी श्री.काशिनाथ गोविंद पाटील, रा.कोपरी, ता.वसई, जि.पालघर यांनी त्यांचे मालकीची मौजे निघोज, ता.राहाता, जि.अहमदनगर येथील गट नं.१७७, १७८, २८२/१, २८४ व २८८/६ मधील भूखंड क्रं.१ मधील (साई पालखी निवारा मधील) इमारत बी क्षेत्रफळ २६३३.७६ चौमी व इमारत डी चे क्षेत्रफळ ७१४८.६८ चौमी असे एकूण ९७८२.४४ चौमी. इतके क्षेत्रफळ असलेल्या व रक्कम रु.३२,२७,१३,५००/- इतकी किंमत असलेल्या दोन इमारती श्री साईबाबांचे चरणी आज दान केल्या असून सदरचे दानपत्र संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांचे हस्ते स्विकारण्यात आले. त्याप्रसंगी साईधाम मंदिर ट्रस्ट, विरार चे ट्रस्टी सर्वश्री काशिनाथ गोविंद पाटील, शेखर नाईक, प्रदिप तेंडोलकर, मोहन मुदलियार यांचा कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदिप आहेर, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, उपकार्यकारी अभियंता श्री.आर.बी.आहेर, संस्थान पॅनलवरील वकील अॅड.जे.के.गोंदकर, सल्लागार कृष्णा वालझाडे उपस्थित होते.