दहावीसाठी शाळास्तरावर प्रात्यक्षिकाचे दिले जाणारे वीस गुण पुढील वर्षीपासून बंद आणि यापुढे खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्येही शिक्षक भरती शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. हे दोन निर्णय भविष्यात महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरू शकतात. कारण शिक्षकांची भरती करणे हे अत्यंत गरजेचे बनत चालले आहे. आज राज्यात शिक्षणशास्त्र पदविका आणि पदवी धारण केलेले लाखो युवक बेरोजगार म्हणून फिरत आहेत. पूर्वी डीएड शिकले की हमखास नोकरी लागायची. मात्र, आज तशी परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे शिक्षक होऊ पाहणारी मंडळी सध्या नोकरी नसल्यामुळे त्रस्त आहेत. गेल्या आठ वर्षांपासून शिक्षकांची भरती केली गेली नाही. त्यामुळे अनेक जण प्रतीक्षेच्या रांगेत डोळे लावून बसले आहेत. दरवर्षी भरती होईल काय? म्हणून ते सर्वांना विचारणा करतात. मात्र, तसे काहीच होत नाही. ही झाली सरकारी शाळेची व्यथा. खासगी शाळेची कथा काही औरच आहे. येथील भरती ही संस्थाचालकांच्या मर्जीवर असल्यामुळे येथे पैशांचा घोडाबाजार चालतो. पूर्वी लाख-दीड लाख देऊन नोकरी मिळायची, पण आज तशी परिस्थिती राहिली नाही. प्राथमिक शिक्षक पदासाठी दहा लाख, माध्यमिक शिक्षकांसाठी वीस लाख आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी पंचवीस लाख रुपये हे ठरलेले भाव आहेत. गरीब पालकांची मुले एवढा पैसा आणणार कुठून? एवढा पैसा जवळ राहिला असता तर ते नोकरी कशाला करत असते? बरेच युवक आपल्या आईचे मंगळसूत्र आणि बापाची जमीन गहाण ठेवून संस्थेत पैसा भरतात. त्यात ही बर्याच संस्थेत शिक्षकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते ती गोष्ट वेगळी. या सर्व बाबींवर शालेय शिक्षण विभागाने खासगी संस्थेत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याचा घेतलेला निर्णय गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरेल. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा या बेरोजगार युवकांच्या कोपर्याला गूळ लावल्यासारखे होईल.
याच निर्णयासोबत घेतलेला दुसरा निर्णय म्हणजे शाळास्तरावर देण्यात येणारे तोंडी परीक्षेचे वीस गुण बंद करणे. सर्व विषयासाठी तोंडी परीक्षा आणि त्यासाठी वीस गुण याची काहीच आवश्यकता नाही. मात्र, तत्कालीन शासनाने हा निर्णय का घेतला हे एक संशोधनाचा विषय आहे. मात्र, यामुळे दहावीच्या गुणांचा फुगवटा जो तयार झाला आहे त्यावर विचार होणे कुठेतरी आवश्यक होते. मुलांना गुणांची खैरात देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहोत की, खोटे गुण देऊन त्यांना खड्ड्यात ढकलत आहोत. याचाही विचार होणे क्रमप्राप्त आहे. आज जी मुले 80 टक्क्यांच्या पुढे आहेत, ते मुळात 60 ते 70 टक्क्यांपर्यंत आहेत याची जाणीव मुलांना करून देणे आवश्यक आहे. आज जी मुले एवढी गुणवंत आहेत असे वाटत आहेत ती मुले बारावीला यश मिळवत नाहीत. यामागे काय कारण असेल? दहावीच्या परीक्षेतील पेपर एकतर खूपच सोपे काढले जात असतील, पेपर तपासणारी मंडळी हात सोडून गुण देत असतील, जास्त गुण घेणार्यांचे पेपर पुन्हा कडक तपासले जात नसतील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा केंद्रावर नकला चालत असतील म्हणून दहावीची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे. टक्केवारी वाढली म्हणजे मुले गुणवंत झाली, असे होत नाही. म्हणून सर्वप्रथम तोंडी परीक्षेचे 20 गुण कमी करणे आवश्यक आहे. त्याचसोबत परीक्षा केंद्रांवर नकला होणार नाहीत याचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचसोबत परीक्षेमध्ये मुलांची भाषा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व देणारे दीर्घोत्तरी प्रश्न असायला हवे, तरच दहावीची खरी परीक्षा होईल आणि खरे विद्यार्थी बाहेर पडतील. शासनाच्या या निर्णयाने बराच फरक पडेल, यात शंका नाही.
– नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769