दोन गटातील हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण

0
पिंपरी :  दोन गटात सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचा-यांना भांडण करत असलेल्या दोन्ही बाजूच्या लोकांनी मारहाण केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्यासमोर घडली.
पोलीस नाईक व्ही एस कुदळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार साजन सुभाष सुकळे (वय 19), सुभाष रामा सुकळे  (वय 40), लहू बापू सुकळे (वायू 23), अनिल अण्णा सुकळे (वायू 22), शिवाजी बापू सुकळे (वय 30, सर्व रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांना अटक केली आहे. तर अटक आरोपींसह यशवंत लक्ष्मण सुकळे, दिगंबर लक्ष्मण सुकळे, तानाजी रामा सुकळे, राजाराम रामा सुकळे, अर्जुन रामा सुकळे, सतीश अर्जुन सुकळे, शिला उर्फ बाबू लक्ष्मण सुकळे, साखरबाई बापू सुकळे, रखमाबाई अर्जुन सुकळे, जनाबाई शिवाजी सुकळे, बापू गोविंद सुकळे, गंधारबाई सुभाष सुकळे आणि इतर चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर, जगदाळे, गंभिरे या तीन पोलीस कर्मचा-यांना मारहाण झाली. तसेच पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारी यांना धक्काबुकी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबानगर झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेबद्दल अपशब्द लिहिले. यावरून दोन गटात वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. यावेळी पोलीस कर्मचारी कुदळ, भांडवलकर आणि त्यांचे सहकारी तिथून जात होते. दोन गटात सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले. पोलीस आलेले बघताच दोन्ही बाजूच्या लोकांनी पोलिसांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्काबुक्की तसेच काठीने मारहाण केली. कोयता दाखवून आरोपींनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भांडवलकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक  ए बी शेटे तपास करीत आहेत.