भुसावळ/धुळे : धुळे गुन्हे शाखेने दोन कट्टे बाळगणार्या संशयीताच्या गोपनीय माहितीच्या आधारे मुसक्या आवळल्या आहेत. भावेश मिलिंद जोशी (20, प्लॉट नंबर 94, एकता नगर, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात धुळ्यातील देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीनुसार कारवाई
धुळ्यातील भावेश जोशी या तरुणाकडे गावठी कट्टे असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बिलाडी फाटा भागातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून 50 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. आरोपीविरोधात गुरूवारी देवपूर पोलिसात गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल श्रीशैल बापूराव जाधव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार अशोक पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, श्रीशैल जाधव, प्रशांत माळे, महेश मराठे आदींच्या पथकाने केली.