दोन घरे स्फोटात खाक

0

शिरपूर । शिरपूर तालुक्यातील विखरण येथे सकाळी रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने दोन घरे उध्वस्त झाले. या घरांची आग भोवताली पसरून चार घरे जळाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. विखरण गावात संभाजी राजाराम पाटील यांचे जुने लाकडी बांधकाम असलेले धाब्याचे घर आहे. सकाळी आठला नाश्ता तयार करताना घरातील गॅस सिलेंडरच्या नळीतून गॅस गळती सुरू झाली. काही क्षणातच नळीने पेट घेतला. आग सिलेंडरच्या तोंडापर्यंत पोहोचली. संभाव्य अपघात लक्षात घेऊन घरातील सर्वजण अंगणात पळाले. शेजार्‍यांनाही सूचित केल्याने ते बाहेर पडले. पाटील यांच्या घरातील आग पसरत गेली. स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटर कमालीचे तापल्याने त्याच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यात संभाजी पाटील व त्यांचे शेजारी नितीन सुधाकर पाटील यांच्या घराचे छत व भिंती कोसळल्या. शेजारील रघुनाथ न्हावी व भाईदास न्हावी यांची घरेही पेटली.

चार घरांचे नुकसान
या घटनेत पाटील यांनी हरभरा विकून घरात ठेवलेले 70 हजार रुपये, संसारपयोगी साहित्य, कपडे, धान्य आदी जळून खाक झाले. घरातील महिलांचे मिळून एकूण 10 ग्रॅम सोने भिंतीच्या मातीने तयार झालेल्या चिखलात बेपत्ता झाले. चारही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरपूर पालिकेच्या तीन बंबानी आग आटोक्यात आणली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.