पुणे । रस्ता ओलांडण्यासाठी डीव्हायडरवर उभे राहिलेल्या पाच जणांना एका कारचालक महिलेने धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी बाणेर गाव रस्त्यावरील वसुधा सोसायटीसमोर घडली. या भीषण अपघातात एका बालिकेचा जागीच मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलीसह दोन महिला आणि एका इसमाचा समावेश आहे. कारचालक महिला एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याने पोलीस याप्रकरणाबाबत चालढकल करीत असल्याचा आरोप तेथील नागरिकांकडून होत आहे.
ईशा अजयकुमार विश्वकर्मा (वय 3) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. पुजा अजयकुमार विश्वकर्मा (वय 24, रा. बाणेर रोड) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. साजिद शाहीद शेख (वय 4) याच्यावर सह्याद्री रुग्णालयात तर निशा शाहीद शेख (रा. बाणेर) व साजित अल्ली (वय 25) या गंभीर जखमींवर वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारचालक महिला सुजाता जयप्रकाश श्राफ (रा. बाणेर) हिच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात रात्री उशारापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ईशा व तिची आई पुजा तसेच, साजिद व त्याची आई निशा शेख आणि साजिद अल्ली हे खरेदी करून घरी जात होते. वसुधा सोसायटीसमोरून सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास रस्ता ओलांडण्यासाठी ते डिव्हायडरवर उभे होते. वाहनांची वर्दळ असल्याने ते दोन ते तीन मिनिटे डिव्हायडरवरच थांबले होते. त्याचवेळी सुजाता ही तिची आयटेन कार घेऊन पुण्यावरून बाणेरच्या दिशेने भरधाव वेगात निघाली होती. तिने डिव्हाडरवर उभे असलेल्या या पाचजणांना जोरात धडक दिली. कार इतकी वेगात होती की, पाचहीजण 10 ते 15 फूट लांब जाऊन रस्त्यावर पडले होते. नागरिकांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.