दोन झेंड्यांची योजना घसरलेल्या गाडीचे लक्षण: शिवसेना

0

मुंबई : महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे पहिले महाधीवेष्ण नुकतचे मुंबई येथे पार पडले. या अधिवेशनात राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते राजमुद्रा असलेल्या नव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावरून शिवसेनेने टीका केली असून, दोन दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे असे म्हणत सामनातून मनसेवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

तसेच वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार उसना असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा असे म्हटले आहे. गेल्या १४वर्षांत राज ठाकरे यांना ‘मराठी’ प्रश्नावर काही भव्य काम करता आले नाही व आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाग्य आजमवता येईल काय? याबाबत शंकाच जास्त असल्याचे म्हटले आहे.

‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत. यावर मनसे काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.