सोनगीर । मुंबई – आग्रा महामार्गावरील सोनगीर गावाच्या पुढे गुरूवारी पहाटे दोन ट्रकांची आमने-सामने धडक होवून क्लिनर ठार झाला. तर अन्य एका जखमीला उपचारार्थ धुळ्याला नेत असतांना त्याचेही निधन झाल्याचे वृत्त आहे. राजस्थानहून फरशी घेवून निघालेला आर.जे.17/ जीए-5737 हा ट्रक धुळ्याकडे येत असता वाघाडी फाट्यावर महामार्ग रस्त्याचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक सुरु होती. त्यामुळे धुळ्याहून शिरपूरकडे जाणारा टि.एन.52/एच-9123 हा ट्रकही समोर आला. पहाटेची वेळ असल्याने वाहन नियंत्रीत झाले नाही. परिणामी, दोन्ही ट्रक परस्परांवर आदळले.
अपघाताने महामार्गांवरील वाहतूक खोळंबली
पहाटे 5.30 च्या सुमारास झालेल्या या अपघाताच्या मोठ्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले. या अपघातामुळे फरशी वाहून नेणार्या ट्रकमधील फरशी कॅबीन तोडून पुढे सरकली. ती थेट क्लिनर कमलसिंह रामप्रसाद डांगी (24) याच्या पाठीमागून अंगावर आदळली. पुढे ट्रकचा भाग आणि मागे फरशी यात दाबला गेल्याने कमलसिंग जागीच ठार झाला. तर या अपघातातील अन्य एक जखमी आर.अरुणकुमार राज (21) रा.तामिळनाडू यास उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. सोनगीर पोलिसांना खबर मिळताच उपनिरीक्षक राजेंद्र पाटील हे सहकार्यांसह घटनास्थळी धावून गेले. त्यांनी मयत कमलसिंह याचे पार्थिव ग्रामीण रुग्णालयात हलविले तसेच अपघातग्रस्त दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला करुन सुरु असलेली एकेरी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल एक ते दिड तास खोळंबली होती.