संत तुकाराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
देहुरोड : तब्बल दोन तपांनंतर भेटलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेचे मंतरलेले दिवस अनुभवले. दोन तपांनंतर तीच शाळा, तोच वर्ग, तेच विद्यार्थी व तेच गुरुजन असा दुग्धशर्करा योग यानिमित्ताने जुळून आला होता. सर्वजण अगदी विद्यार्थीदशेत असल्याप्रमाणे शाळेत वावरत होते. प्रत्येकाच्या मनात शालेय जीवनातील तोच उत्साह ओसंडून वाहत होता. रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालय सुदुंबरे येथील सन 1994-95 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘स्नेहमेळावा’ नुकताच पार पडला. या स्नेह मेळाव्यासाठी गुरुवर्य नवले, वाघमारे, जगदाळे तसेच अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जगताप उपस्थित होते. तब्बल चोवीस वर्षांनंतर देखील 35 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
गुरूजनांचा केला सन्मान
हे देखील वाचा
त्यावेळी शिकविणार्या सार्या गुरूजनांचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ आणि राजीव दीक्षित यांचे आरोग्यमंत्र हे पुस्तक प्रदान करून गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. यानंतर प्रत्येकाने शाळेशी असलेला ऋणानुबंध आणि कृतज्ञतेची भावना मनोगतातून व्यक्त केली. सर्व माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देण्यात आली. सुनील देवकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. यावेळी सर्व गुरूजनांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहचल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेसाठी स्वतःच्या हक्काची इमारत उभी करण्यासाठी गावातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शाळेचे प्राचार्य जगताप यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षक गुजराथी सरांचा देखील सन्मान करण्यात आला.
एकमेकांचा घेतला निरोप
सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याबरोबर त्यांच्या जडण घडणीत महत्वाचा वाटा आहे. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील काळात एकत्र येऊन सामाजकार्य करण्याचा संकल्प करून सर्वांनी जड पावलांनी एकमेकांचा निरोप घेतला. या स्नेहमेळाव्याची संकल्पना वैशाली दिवेकर (जाधव) आणि अतुल बालघरे यांनी मांडली होती. सूत्रसंचालन बापू बोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संदीप भसे, बाळू पानमंद, संदीप रा. गाडे, संदीप मा. गाडे यांनी केले. रेखा कराळे (मेदनकर) यांनी आभार केले.