दोन दिवसांत 200 आधार केंद्रे सुरू करणारः जिल्हाधिकारी

0

पुणेः आधारकार्ड काढण्यासाठी जिल्ह्यात तसेच शहरात नागरिकांना त्रास होत असून होणारा त्रास लक्षात घेऊन आता महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्र यांना सरकारी कार्यालयांचा दर्जा घोषित करण्यात आला असून, जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत 200 आधार केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यांपैकी शहरामध्ये 38 केंद्र मंगळवारपासून सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

महापलिका, नगरपालिका आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये आधारकार्ड केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महा-ई-सेवा केंद्रातील ऑपरेटर्सनी केंद्र सोडून संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन बसण्यास नकार दिला होता. त्यामुळे अडचण निर्माण झाली होती. आधारकार्ड काढण्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारीही आल्याने हे प्रकार बंद करण्यासाठी ऑपरेटर्सकडून 50 हजार रुपयांची बँक गॅरंटी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयामुळेही नागरिकांना आधारकार्ड मिळण्यात अडथळा आला. या पार्श्वभूमीवर आता ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्र यांना राज्य सरकारने सरकारी कार्यालयांचा दर्जा देण्याचे घोषित केले आहे.

याबाबत राव म्हणाले, ‘ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्र यांना सरकारी कार्यालयांचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणीच आता आधारकार्ड देण्याची व्यवस्था असणार आहे. मंगळवारी शहरातील 38 केंद्र सुरू झाली आहेत. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात 200 केंद्र सुरू केली जाणार आहेत. याशिवाय पुणे महापालिकेतील 15 क्षेत्रीय कार्यालये आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही केंद्र असणार आहेत.