जळगाव । गेल्या पाच वर्षापासून मनपा अधिकार्यांना सांगून थकलो, तरी विसर्जनमार्ग व मोठ्या मंडळाच्या ठिकाणचे रस्ते दुरुस्त होत नाहीत, गटारींचीही अवस्था दयनीय झालेली आहे. जुन्या जळगावात बांधकामामुळे रस्त्यावर साहित्य पडलेले आहे, अशा तक्रारी गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत केल्या. या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर दोन दिवसात रस्ते दुरुस्तीसह आवश्यक त्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिले. यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, तहसीलदार अमोल निकम, मनपा अभियंता सुनील भोळे, महावितरणचे तडवी, परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील व्यासपीठावर होते.
सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जाईल
सावर्जनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी पोलिसांच्या दिमतीला काम करण्यासाठी महामंडळाचे शंभर कार्यकर्ते गणरक्षक म्हणून काम करतील तर विसर्जनासाठी महिलांच्या सुरक्षेबाबतही विशेष खबरदारी घेतली जाईल असे सांगितले. जुन्या जळगाव भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. गटारींच्या बांधकामामुळे रस्त्यात अडथळा तयार झालेला आहे. तसेच स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. एक खिडकी योजनेतही गोंधळ उडत असून पुढील वर्षी त्यासाठी कोणत्या तरी विभागावर जबाबदारी निश्चित करावी असे त्यांनी सांगितले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
उत्सव सार्वजनिक आहे. सर्व धर्माच्या लोकांनी मिळून आनंदात हा उत्सव साजरा करावा. शहर व गाव आपले आहे, त्यामुळे अफवा असो की अन्य कारण उत्सवाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, संयम ठेवावा असे आवाहन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. पोलीसही बंदोबस्तासह उत्सवात सहभागी होतील. सोशल मीडियावर अफवा पसरविणारे सायबर यंत्रणाच्या माध्यमातून सहज पकडले जातील, त्यामुळे कोणीही अफवा पसरवून वातावरण बिघडविण्याचे काम करु नये असे कराळे म्हणाले.
कलेक्टर, एस.पी.रात्री घालणार गस्त
गणेशोत्सवात काय अडचणी आहेत, त्याची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: पोलीस अधीक्षकांना सोबत घेऊन रात्री शहरात फिरणार असल्याचे जिल्हाधिकाजयांनी सांगितले. तसेच त्यावर मार्ग काढण्याबाबत पुन्हा दोन दिवसात मंडळाच्या प्रमुख पदाधिकाजयांची बैठक घेऊ असेही ते म्हणाले.सर्व धर्मगुरुंच्या हस्ते आरती करण्याच्या सूचनेचे स्वागत करुन जिल्हाधिकाजयांनी त्यासाठी पुढाकार घेतला.