जळगाव । सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव इनमादार यांचे जन्मशताब्दी वर्षांचे औचित्यसाधून जळगाव जनता बँक व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 18 व 19 जानेवारी रोजी सहकारी बँकांसाठी राष्ट्रीय पातळीवरील सहकार परिषदेचे आयोजन जैन हिल्स येथे करण्यात आले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अनिल राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी संजय बिर्ला, व्हा. चेअरमन डॉ. प्रतापराव जाधव, संजय नागमोती, कपील चौबे, सीईओ पुंडलीक पाटील, सतिष भदाणे आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार
या परिषदेचे उद्घाटन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिन्द्रभाई मेहता यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अनिल जैन हे उपस्थित राहणार आहेत. तर परिषदेच्या समारोपप्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असे सुमारे 250 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दोन दिवशीय परिषदेत 18 जानेवारी रोजी विविध विषयांवर सहकार भारतीचे संरक्षक सतीश मराठे, उदय कर्वे, एस. व्ही. हर्डीकर, निलेश पाटील, सौरव कुमार, भुषण कोंडूरकर मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसर्या दिवशी 19 रोजी सीए प्रकाश पाठक, विनायक गोविलकर, अरविंद खळदकर, सतीश मोध मार्गदर्शन करणार आहेत. यासोबत विविध चर्चा सत्रांमध्ये जयेशभाई दोशी, सत्यनारायण लोहिया, दिपक मुकादम यांचा समावेश असणार आहे. यांच्यासोबतच बँकींग क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.