अडीच तास मृतदेह रस्त्यावरच ; डांभूर्णी-कोळन्हावी रस्त्यावरील दुर्दैवी घटना
यावल:- दोन भरधाव दुचाकी समोरा-समोर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना डांभूर्णी-कोळन्हावी रस्त्यावर बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात जगदीश योगराज पवार (वय 42, रा.कवठळ, ता.धरणगाव) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, तब्बल अडीच तास मृतदेह घटनास्थळी पडून असतानाही कुणी मदत केली नाही तर अखेर पोलीस आल्यानंतर मृतदेह हलवण्यात आला.
दुचाकी धडकल्याने अपघात
कोळन्हावी (ता. यावल) येथील रहिवासी नरेंद्र अशोक सोळुंके याने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास यावलहून नवी दुचाकी खरेदी करीत कोळन्हावी गाठले. दुचाकीची पुजा केल्यावर दुपारी चारच्या सुमारास तो फेरफटका मारण्याकरीता कोळन्हावीहुन डांभुर्णीकडे येत असताना समोरून जळगावकडे येणारी दुचाकी (क्र. एम. एच. 19 ए. जी. 1826) वरील जगदीश योगराज पवार हे आपल्या सहकार्यासोबत येत असताना दोन्ही दुचाकी समोरा-समोर आदळल्या. या अपघातात पवार हे जागीच ठार झाले तर नरेंद्र सोळुंके व एक अन्य जण जखमी झाला. दोघांना घटनास्थळावरून धानोरा येथील 108 वाहनाद्वारे जिल्हा सामान्य रूगणालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती यावल पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अशोक आहिरे व हवालदार संजीव चौधरी हे रवाना झाले. पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. रात्री उशीरायावल पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.