दोन नवीन प्रभागासाठी नवीन फर्निचर

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या नवीन दोन प्रभागांसाठी फर्निचर खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी येणार्‍या 20 लाख 11 हजार 520 रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. सध्या अ, ब, क, ड, इ आणि फ असे सहा प्रभाग आहेत. त्यामध्ये सांगवी आणि थेरगाव येथे होणार्‍या ग आणि ह अशा आणखी दोन प्रभागांचा समावेश होणार आहे.

कमी दराच्या तीन निविदा
नवीन प्रभागरचेनुसार या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांसाठी आवश्यक फर्निचर पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागामार्फत खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेतर्फे प्रसिद्धी देऊन ऑनलाईन निविदा मागविली होती. एकूण एक ते सहा बाबींसाठी प्राप्त निविदांमधून सर्वात कमी दराच्या तीन निविदा स्वीकारण्यात आल्या. त्यामध्ये तीन व चार क्रमांकांच्या बाबींसाठी निर्मिती इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन या ठेकेदार कंपनीची 11 लाख 22 हजार 480 रुपये किमतीची निविदा आहे. पाच आणि सहा क्रमांकांच्या बाबींसाठी शिवसमर्थ एंटरप्रायजेसची चार लाख 73 हजार 40 रुपये किमतीची आणि एक व दोन क्रमांकांच्या बाबीसाठी स्वराज्य फर्निचर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक मॉलची चार लाख 16 हजार रुपयांची निविदा आहे. तीनही निविदांचे दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा 44.88 टक्क्यांनी कमी आहेत. फर्निचर खरेदीसाठी 20 लाख 11 हजार 520 रुपये खर्च येणार असून नवीन ’ग’ आणि ’ह’ क्षेत्रिय कार्यालयांसाठी फर्निचर तिन्ही ठेकेदार कंपन्यांकडून खरेदी केले जाणार आहे.