औरंगाबाद । शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ विनायक नगर आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथील बनावट गुटखा कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने एकाचवेळी छापा मारला. या धाडीत दोन बनावट गुटखा पॅकिंग करणार्या यंत्रासह अंदाजे वीस लाख रुपयांचा कच्चा माल मुद्देमाल ताब्यात घेऊन सील केला. या वर्षाची पोलिसांना दूर ठेवून अन्न प्रशासनाने केलेली मराठवाड्यातील पहिली मोठी कारवाई ठरली.
पहिल्या पथकाने सातारा परिसरातील खंडोबा मंदिर परिसरात राहणार्या सय्यद मोसीन या गुटखा पुरवठादाराच्या घरी 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता एफडीएच्या अधिकार्यांनी छापा मारला. त्यानंतर त्याला सोबत घेऊन मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन जवळील विनायक नगर येथील हनुमंत श्रीपत मुंडे या भागीदाराचे घर गाठले. तेथे सोनपापडी बनवणार्या बेकरीत रामकुमार चंद्रवंशी (रा.राजनांदगाव, छत्तीसगड) आणि संदीप श्रीहरी वाकेकर (रा.पालोरा,जि. भांडारा) या कामगारांसह विविध प्रकारचा पॅकिंग घुटखा आणि विविध कंपनीच्या गुटखा पॅकिंग सामानासह पॅकिंग यंत्र आढळून आले. याची किंमत अंदाजे10 लाख 25 हजार रुपये असल्याचे आलेल्या एफडीए च्या अधिकार्यांनी सांगितले. दुसर्या पथकाने त्याच दिवशी त्याचवेळी चिकलठाणा, हिना नगर येथील अजहर खान अकबर खान यांचे घर गाठले. त्याठिकाणी एका कंपनीच्या गुटखा पॅकिंगचे साहित्य आणि अडीच क्विंटल कच्चा माल व दोन गोण्या पॅकिंग गुटखा आठळून आला. याची अंदाजे किंमत 9 लाख 45 रुपये आहे.या ठिकाणी या बनावट गुटख्याच्या कारखान्याचा मालक कारवाई पूर्ण होईपर्यंत घटना स्थळी आलेला नव्हता, अशी माहिती या पथकाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त अशोक पारधी यांनी सांगितले. या दोन्ही छाप्यातील दोषींवर अन्न सुरक्षा व मानके 2006 या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
एफडीआयची कारवाई
पोलीस अनभिज्ञ गुटखा विक्री करणार्यांचा शोध घेऊन त्यांना गुटखा पुरवणार्यांवर पळत ठेवली. त्यानंतर साध्या वेशात अवैध गुटखा पुरवठादारावर पाळत ठेऊन त्यांना माल पुरवणार्या बड्या स्टॉकिस्ट ला पकडण्यासाठी गेल्या दोन तीन दिवस खातरजमा करून सापळा रचला. त्यासाठी जालना, बीड, नांदेड जिल्ह्यातून अन्न सुरक्षा अधिकारी व सहाय्यकांना गुरुवारी शहरात पाचारण करण्यात आले होते. दोन पथकांनी धाडीला सुरवात केली. चिकलठाणा आणि मुकुंदवाडीच्या दोन्ही छाप्यात वीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.