दोन भाऊतील वाक युध्द जिल्हा परिषद युतीस अडचण ठरणार का?

0

प्रदिप चव्हाण । नुकतीच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 67 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 164 गणासाठी निवडणुक पार पडली. जिल्हा परिषदेच्या 67 पैकी 33 जागांवर भाजपाने विजय मिळविला असुन जवळपास नऊ पंचायत समितीवर पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी भाजपाला एका जागेची आवश्यकता असल्याने कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे. भाजप नेहमीचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची मदत घेऊन सत्ता स्थापन करतो की अन्य मार्ग निवडतो यावर राजकीय खलबते सुरु आहे. राज्यात युती असल्याने जिल्ह्यात भाजप शिवसेनेशींच युती करु शकतो. मात्र नुकतीच जिल्हा बँकेने नोटाबंदीच्या काळात चलनातुन बाद झालेल्या करोडो रुपयाच्या नोटा बदलुन दिल्याच्या संशयाने बँकेची सीबीआय चौकशी सुरु आहे. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर ह्या जिल्हा बँकेच्या चेअरमन असल्याने खडसेंकडे बोट दाखविले जात आहे. राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी नाथाभाऊंवर घोटाळ्याचे उघड उघड आरोप केले आहे. त्यावर खडसें यानी गुलाबराव पाटील यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले असल्याने दोन्ही भाऊमध्ये पुन्हा वाद उद्भण्याची शक्यता आहे. युतीचा प्रश्‍न मार्गी न लागल्याने हा वाद जिल्हा परिषद युतीसाठी अडचण ठरु शकते की काय असे बोलले जात आहे.

खडसे यांच्या मागील ग्रह सुटता सुटेना
जळगाव जिल्ह्याचे मातब्बर नेते म्हणून माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची ओळख आहे. जिल्ह्यात भाजपा या पक्षाला उभारणीत त्यांची भुमिका ही खुप मोठी आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पद स्वतःच्या घरात ठेवल्याने जिल्ह्यात त्यांचे विरोधक निर्माण झाले. यातुनच खडसे यांच्याबद्दल राजकीय षडयंत्र रचले गेले. सुरुवातीस दाऊद प्रकरण त्यानंतर पुणे येथील भोसरी प्रकरण अडकल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण मार्गी लागत नाही तोच नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेने 73 कोटी रुपये बदलुन दिल्याचे प्रकरण समोर आल्याने त्यांच्याकडे बोट दाखविली जात आहे. यातुन खडसे यांचा मागील ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

युतीसाठी महाजनांची भुमिका महत्त्वाची
जळगाव जिल्ह्याचे राजकारण हे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला परिचीत आहे. दोन वेगवेगळ्या पक्षाचे दोन मंत्री या जिल्ह्याला लाभले असल्याने राजकीय वातावरण तापणार यात शंका नाही. निवडणुक काळात आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. परंतु निवडणुक नसतांनाही या जिल्ह्यातील राजकीय वातावरण गरम असते. मागील चार-पाच महिन्यात जिल्ह्यात चार महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला. यांचे श्रेय जलसंपदामंत्री गिरीश महाजनांना दिले जात आहे. कारण महाजनांचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध आहे. जिल्हा परिषद युतीसंदर्भातही त्यांची भुमिका महत्त्वाची असणार आहे.

मुंबईत अप्रत्यक्षपणे युती
भाजपा शिवसेनेची ‘तुझ माझ जमेना, तुझ्या विना करमेना’ ही पध्दत संपुर्ण राज्याला ठाऊक आहे. जळगाव जिल्हा परिषदेवर मागील काही पंचवार्षीक निवडणुकीत भाजपा शिवसेनेने युतीचे धोरण अवलंबत सत्ता स्थापन केली आहे. यंदा देखील हेच धोरण अवलंबीले जाईक की काय हा येणारा काळच सांगेल. परंतु मुंबई महानगर पालिकेसाठी सर्वाधिक जागा मिळवित सेना नंबर एकचा पक्ष ठरला आहे मात्र त्यानांही सत्ता स्थापनेसाठी युती करावीच लागणार आहे. मुंबईच्या राजकारणात आता भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांची अप्रत्यक्षपणे का होईना एकी झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर भाजपा व शिवसेना यांच्यात युती होण्याची चिन्हे दिसून येत आहे.