बारामती । एमआयडीसी, पेन्सिल चौक व विद्यानगरी परिसरात मोबाईल चोरी करणार्या दोघांना बारामती पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. महिलेचा मोबाईल हिसकावून पळून जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून एक दुचाकी व तीन मोबाईल असा 69 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. खंडु भाऊ जगताप (वय 24 रा. शिरवली), संजय दत्तात्रय कडाळे (वय 23 रा. माळेगाव खु.) अशी त्यांची नावे आहेत.
सदर महिला विद्यानगरी परिसरातून कामावरून घरी जात असताना या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. या महिलेने आरडाओरडा केल्याने येथे आसपास असलेले बाळा दराडे व पोपट दराडे तसेच इतर चार पाच जणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. याबाबत खबर मिळताच पोलिसांनी ताबडतोब शोध मोहीम सुरू करून या दोघा चोरट्यांचा माग काढला. या घटनेच्या आगोदरच 15 मिनिटांपूर्वी एका व्यक्तिचा मोबाईल याच परिसरातून याच पद्धतीने गेल्याची तक्रार केली होती. हे दोघे चोरटे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या आवारात शिरल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी या दोघांना विश्रामगृहाच्या आवारातून ताब्यात घेतले. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरिक्षक काळे करीत आहेत. पोलिस हवालदार बंडगर, मनेरी, नांदगुडे, चालक चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.