दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ : शहर पोलिसात गुन्हा

भुसावळ/जळगाव : शहरातील गेंदालाल मिल परीसरात राहणार्‍या विवाहितेने दोन लाख रुपये न आणल्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पतीसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परीसरातील माहेर असलेल्या परवीन बी. अशफाक यांचा विवाह मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथील अशफाक मोहम्मद लालू यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्न झाल्यापासून कोणत्याही कारणावरून पती अशफाक याने विवाहितेला शिविगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर विवाहितेला सासू व सासरे यांनी घरात सामान घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. आई-वडीलांची परीस्थिती नाजूक असल्याने पैसे देऊ शकत नाही, असे सांगितल्यावर विवाहितेच्या सासूने शिविगाळ केली तर पती याने मारहाण केली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता गेंदालाल मिल, जळगाव येथे माहेरी निघून आल्या.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
विवाहितेने जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर पती अशफाक मोहमंद लालू, सासू जहारा मोहम्मद लालू, दीर इजाज मोहम्मद लालू, सासरे आजम नुरा पहलवान, नणंद कलीम उर्फ गुड्डी, जेठ हिनफ जब्बार, फुफा सासरे कमरूद्दीन डॉक्टर, नणंद फरजाना साधिक सर्व रा. बुर्‍हाणपुर मध्यप्रदेश आणि नंदोई अलिम अख्तर (रा.उज्जैन, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात शनिवार, 25 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक करुणा सागर करीत आहे.