नाशिकातील व्हिडिओ व्हायरल
नाशिक | महापालिकेसाठी पैसे घेऊन उमेदवारी दिली नसल्याचा दावा भाजपचे नेते करत असताना, चक्क भाजपच्याच कार्यालयात एकेका तिकिटासाठी दोन-दोन लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भाजपचे निष्ठावंत उमेदवारीसाठी झगडत असताना भाजपचे सरचिटणीस नाना शिलेदार व कार्यालय सचिव अरुण शेंदुर्णीकर हे उमेदवारांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये मागत असल्याचे एका व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या निष्ठावंतांनीच ही पोलखोल केली असून, या व्हिडिओमुळे भाजपनेते अडचणीत आले आहेत. नाशिकात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो राज्यात सर्वत्र झपाट्याने पसरला. त्यानंतर एकच खळबळ उडाली व भाजप नेत्यांनी आपले मोबाईल स्वीचऑफ करून ठेवले. या प्रकाराने भाजपची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. तर हा निवडणुकीचा मुद्दा करण्याची तयारी इतर राजकीय पक्षांनी चालवली आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातही पैसे घेऊन तिकिटे वाटल्याचा आक्षेप निष्ठावंतांनी व्यक्त केला होता. तसेच, निष्ठावंतांना डावलल्याने तीव्र असंतोषदेखील उफळलेला आहे. त्यामुळे उमेदवारी वाटपात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत.
भाजप कार्यालयातच मागितले दोन लाख
महापालिकेसाठी निष्ठावंतांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर, स्थानिक नेत्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप झाला होता. एकेका तिकिटासाठी 30 लाख रुपयांचा रेट लावल्याचा दावा निष्ठावंतांनी केला होता. हे आरोप खोडून काढताना नाशिक भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नाकीनऊ आले होते. परंतु, आता पैसे घेऊन उमेदवारी वाटपाचा आरोप खरा ठरविणारा एक व्हिडिओच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ निष्ठावंतांनीच व्हायरल केल्याने भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपचे सरचिटणीस नाना शिलेदार व कार्यालय सचिव अरुण शेंदूर्णीकर हे इच्छुकांना दोन लाख रुपये मागत असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. भाजप कार्यालयातीलच हा व्हिडिओ आहे.
भाजपचे तिकीट वाटप संशयाच्या भोवर्यात
या व्हिडिओत एबी फॉर्म वाटपापूर्वी दोन लाखाची रोकड किंवा दोन लाखांचा धनादेश जमा करण्यास सांगितले जात आहे. भाजपश्रेष्ठींनी निश्चित केलेली यादी समोर ठेवूनच ते पैसे मागत असल्याचे दिसत आहे. आता पैसे नाहीत, असे म्हणणार्यांना ते प्रशांत जाधव या व्यक्तीला भेटण्याचे फर्मान सोडत आहेत. विशेष म्हणजे, प्रशांत जाधव या व्यक्तीकडे एबी फॉर्म वाटपाचे काम होते. त्यामुळे भाजपने थेट उमेदवारीसाठी पैसे घेतल्याच्या आरोपांना पुष्टी मिळत आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई या महापालिका निवडणुकीचे तिकीट वाटपही संशयाच्या भोवर्यात सापडले आहे.