मुंबई : गेल्या दोन वर्षांत 2 लाख 75 हजार शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज कनेक्शन दिले असून त्यांनतर आलेल्या मागणीनुसार पुन्हा नवीन 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज कनेक्शन देण्यात येणार आहेत. यासाठी तीन हजार कोटी लागणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
सूजित सिंह ठाकूर व अन्य सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावाच्या उत्तरात ऊर्जामंत्र्यांनी ही माहिती दिली. आगामी मार्च 2018 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणार आहोत. 17 हजार कोटींची थकबाकी असूनही एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन या सरकारने खंडित केले नाही. शेतकऱ्यांकडील थकबाकी, पाणीपुरवठा योजनांवरील थकबाकी, पथदिव्यांची थकबाकी हा महसूल मिळाला तर मोठया प्रमाणात कामे होतील. यानंतर ज्या विभागातून येणाऱ्या वसुलीचा पैसा त्याच विभागावर खर्च करण्याचा निर्णय आम्ही घेतला. दीनदयाळ योजनेसाठी केंद्रशासनाने 2100 कोटींचा निधी दिला आहे. त्यातून फीडर विलगीकरण करण्यात येत आहेत. अजूनही 700 फीडर विलगीकरण व्हायचे आहेत. येत्या दीड वर्षात ही कामे पूर्ण होईल, असे ही ऊर्जामंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना 12 तास दिवसा अखंडीत वीज मिळावी म्हणून सोलर कृषी फिडरची योजना तयार होत आहे. आधी या योजनेसाठी 52 कोटी खर्च होणार होता. तो प्रस्ताव आता 8 ते 10 कोटीत होणार आहे. लाईनमनच्या सर्व जागा भरण्यासाठी एक ग्रामपंचायत एक विद्युत व्यवस्थापक ही संकल्पना आणली आहे. आजही राज्यातील 19 लाख परिवारांना वीज मिळत नाही. आदिवासी भागात 100 टक्के लोकांना वीज पुरवठा करण्यासाठी 1400 कोटी खर्च लागणार आहे. हा सर्व खर्च करण्यासाठी वसूली होण्याची गरज आहे. त्याशिवाय हा कारभार चालणारच नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
थकित वीजबिल ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजना
महावितरणने राज्यातील थकित वीज बिल ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. थकबाकीदार कृषी पंपधारकांना त्यांच्या मार्च 2017 अखेरील थकबाकीतील मूळ रक्कमेचे पाच समान त्रैमासिक हप्ते करून देण्यात येतील. ते त्यांनी त्यांच्या चालू त्रैमासिक विद्युत बिलासोबत भरावे. संपूर्ण व्याज व दंडनीय व्याजाच्या रक्कमेचा महावितरण कंपनीस परिपूर्ती करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल. महावितरण कंपनी सदर जिल्ह्यातील कृषी ग्राहकांच्या थकबाकी वसुलीच्या 50% रक्कम नवीन कृषीपंपाच्या उर्जिकरणाकरीता वापरेल. याकरीता शासन महावितरण कंपनीस कृषी ग्राहकांच्या थकबाकी वसूलीच्या 50% रक्कम नवीन कृषीपंपाच्या उर्जिकरणासाठी अनुदान देईल. शासनाकडून रक्कम मिळाल्यानंतर वरील दोन्ही रक्कमेचा वापर सदर जिल्ह्यात नवीन कृषी पंपाच्या उर्जिकरणासाठी करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले.
रस्त्यावरील दिवाबत्ती ग्राहकांनाही सवलत
थकबाकीदार रस्त्यावरील दिवाबत्ती ग्राहकांना त्यांच्या मार्च 2017 अखेर असलेल्या थकबाकीतील मूळ रक्कमेचे पाच समान हप्ते करून देण्यात येतील. महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील दिवाबत्ती ग्राहकांनी वरील पाच समान मासिक हप्ते त्यांनी त्यांच्या चालू मासिक विद्युत बिलासोबत भरावे. अ, ब व क नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील दिवाबत्ती ग्राहकांना पाच समान द्वैमासिक हप्ते करून देण्यात येतील. सदर हप्त्यासोबत त्यांनी त्यांचे सर्व चालू विद्युत बिल वेळेवर भरणे बंधनकारक राहील. संपूर्ण व्याज व दंडनीय व्याजाच्या रक्कमेचे महावितरण कंपनीस परिपूर्तीबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल. मूळ थकबाकीची रक्कम वरील योजना चालू झाल्यापासून महानगरपालिका क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांना ५ महिन्यांत तसेच अ, ब व क नगरपालिका क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांना १० महिन्यांत भरणे क्रमप्राप्त राहील, असेही त्यांनी सांगितले.