ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे वक्तव्य
मुंबई – राज्यातील ग्रामीण भागात अजूनही हागणदारी मुक्त नसल्याची टीका होत आहेत. यावर बोलताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामीण भागात १-२ लोक रस्त्यावर शौचास बसले म्हणून हागणदारी मुक्तीवर प्रश्नचिन्ह लावू नका, असे वक्तव्य केले आहे. मुंडे यांनी मंत्रालयात केले. एका गावात आधी ४०० लोक शौचासाठी बाहेर जात होते. आता केवळ त्यापैकी ४ किंवा ५ लोकच बाहेर शौचास जात असल्याचे निदर्शनाला येते. याचाही विचार करावा, या शब्दात त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियात हागणदारी मुक्त झाल्याच्या घोषणेवर तीव्र टीका करण्यात आली. ही बाब ग्रामविकास मंत्री मुंडे यांच्या निदर्शनाला आणल्यानंतर त्या म्हणाल्या, त्यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या निकषांवर राज्यात ग्रामीण भाग हागणदारी मुक्त घोषित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अनेकजण या शौचालयांचा वापर करत नसल्याचे त्यांनी मान्य केले. जे लोक रस्त्यावर बसलेल्या लोकांचे फोटो काढतात आणि व्हायरल करतात, त्यांची ही काही जबाबदारी नाही का? असा उलट प्रश्न पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.
गेल्या वर्षभरात सरकारने २२ लाख शौचालयांचे निर्माण केले असून, आगामी काळात आणखी ६० हजारहून अधिक शौचालये बांधण्याचा सरकारचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शौचालयांची निर्मिती झाली आहे. पण, त्या शौचालयांचा वापर इतर कारणांसाठी होत असल्याचे निदर्शनाला येते. त्यामुळे यापुढे शौचालयांचा वापर ग्रामस्थांनी करावा, यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी पुढे नमूद केले.