दोन वर्षांत राज्यातील रस्ते दुरुस्त होणार

0

मुंबई : राज्यात केंद्र आणि राज्य सरकारचे जवळपास 30 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यापैकी काही रस्त्यांची दुरवस्था झाल्याची बाब काही सन्मानीय सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या रस्त्यांच्या आणि अन्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली असू पुढील दोन वर्षांत सर्व रस्ते दुरुस्त करून चांगले करणार असल्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान सभेत दिले. विधानसभेत अर्थसंकल्पातील विभागवार अनुदानाच्या चर्चेच्या दरम्यान शिवसेनेचे अजय चौधरी, सुनील प्रभू आणि भाजपचे अतुल भातखळकर, आशिष शेलार यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता. त्या चर्चेला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी वरील आश्‍वासन दिले.

राज्यातील ग्रामीण भागात रस्ते उभारणीसाठी यावेळी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे 30 कि.मी. लांबीचे 10 हजार कि.मी.च्या रस्त्याची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यांची दुरुस्तीही करणार असल्याचे सांगत वाळू उपसा व त्याच्या लिलावाचे अध्यादेशही लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आदिवासी विभागाचे मंत्री विष्णू सवरा, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही विभागाच्या अनुदानाला मंजुरी द्यावी, अशी मागणी करीत सदस्यांनी मांडलेल्या प्रश्‍नांची उत्तर बुधवारी 29 मार्च रोजी लिखित स्वरूपात देणार असल्याचे सांगितले.