दोन वर्षांनी हत्येच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई – दोन वर्षापूर्वी नशा करताना झालेल्या वादातून आपल्याच सहकार्‍याची निर्घृणरीत्या हत्या करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस काल गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अहमदनगरच्या श्रीरामपूर येथून अटक केली. निलेश रामा शिंदे ऊर्फ निल्या ऊर्फ अभिमन्यू ढळके ऊर्फ आव्या ऊर्फ ढोलक्या असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर बळीराम पांडुरंग रक्ते या तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी शिवाजीपार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बळीराम आणि निलेश हे दोघेही दादर रेल्वे स्थानकात सफाई कामगार व हमालीचे काम करीत होते. या दोघांनाही ड्रग्ज घेण्याची सवय होती. 24 सप्टेंबर 2015 रोजी ते दोघेही दादर रेल्वे पुलाखाली ड्रग्ज पित होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर निलेशने बळीरामची बाटली डोक्यात मारहाण करुन हत्या केली होती. या हत्येनंतर तो तेथून पळून गेला होता. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. तपासात मृत तरुण बळीराम असल्याचे उघडकीस आले. तो निलेशसोबत ड्रग्ज पिण्यासाठी पुलाजवळ बसल्याचे काहींनी पाहिले होते. त्यामुळे निलेशचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. मात्र निलेश हा हत्येनंतर मुंबई सोडून पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी शिवाजी पार्क आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शोधमोहीम सुरु केली होती. मात्र तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. कल्याण, कर्जत, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, शिर्डी, बेलापूर, सोलापूर, दौंड, पुणे आणि कर्नाटक आदी परिसरात पोलीस पथक गेले होते. मात्र पोलीस पोहचण्यापूर्वीच तो पळून जात होता. त्याचा शोध सुरु असतानाच तो अहमदनगर, श्रीरामपूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर अजय सावंत यांच्या पथकातील संपतराव राऊत, नागरे, कोकरे, घागरे, जावळे या पथकाने तिथे जाऊन निलेश शिंदे याला शिताफीने अटक केली. चौकशीत त्याने बळीरामची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला शिवाजी पार्क पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.