दोन वर्षांपासून अलिबाग पोलिसांकडे आरोपींसाठी उपलब्ध नाही कारागृह

0

अटक केलेल्या आरोपींना मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील कारागृहात ठेवण्याची अलिबागकरांवर वेळ

अलिबाग – कुणी कारागृह देता का…, कारागृह देता… असे म्हणण्याची वेळ अलिबाग शहरातील पोलीस ठाण्यावर आली आहे. मागील दोन वर्षांपासून अलिबाग पोलीस ठाण्याकडे कारागृह नसल्याने, अटक केलेल्या आरोपींना मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील कारागृहात ठेवण्याची वेळ अलिबाग पोलिसांवर आली आहे. त्यामुळे कैद्यांची ने-आण करण्यात पोलीस बेजार झाले आहेत. यापूर्वी अलिबाग पोलीस ठाण्याचे कारागृह कोषागार कार्यालयाच्या इमारतीत होता, मात्र कोषागार कार्यालयाने आपली इमारत ताब्यात घेतल्याने अलिबाग पोलिसांवर ही वेळ ओढावली आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबाग शहरासह सुमारे दहा किलोमीटर परिसरात अलिबाग पोलीस ठाण्याची हद्द आहे. या परिसरात वर्षाला शेकडो गुन्ह्यांची नोंद होते. या गुन्ह्यांची उकल करताना अटक केलेल्या आरोपींना कारागृहात ठेवावे लागते. मात्र अलिबाग पोलीस ठाण्याला स्वतचे कारागृह नसल्याने मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या कारागृहात आरोपींना ठेवण्याची वेळअलिबाग पोलीसांवर आली आहे.

आवश्यक सोयी-सुविधांअभावी कारागृह कोषागार इमारतीत हलवले
अलिबाग पोलीस ठाण्याला लागून मागिल बाजूला सुरुवातीला कारागृह होते. मात्र या इमारतीची दुरावस्था झाली. तसेच येथे आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याने येथील कारागृह शहरातील कोषागार विभागाच्या इमारतीत हलविण्यात आले. मात्र दोन वर्षांपूर्वी कोषागार इमारतीच्या नुतणीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यावेळी कोषागार कार्यालयाने येथील कारागृह बंद करण्यास अलिबाग पोलिसांना सांगितले.पोलीसांनीही नुतणीकरणासाठी कारागृह बंद केले. तेंव्हापासून अटक केलेल्या आरोपींना मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील कारागृहात ठेवण्यात येते.

अलिबाग पोलिसांच्या तपास कार्यातही अडथळे
कोषागार इमारतीच्या नुतणीकरमाचे काम पूर्ण झाल्यानंतर पोलीसांनी पुन्हा कारागृहासाठी इमारतीची मागणी केली. मात्र कोषागार विभागाने कारागृहासाठी अलिबाग पोलीसांना इमारत दिली नाही. या इमारतीत कोषागार विभागाने आपला दस्ताऐवज ठेवला. अलिबाग पोलीसांना कारागृहाविना राहावे लागले. मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील कारागृहात अलिबाग पोलीसांनी केलेल्या आरोपींना ठेवण्यात येत असल्याने आरोपींची ने-आण करण्यात एक हवलदार, दोन कर्मचारी, वाहनचालक यांचा वेळ जात आहे. इंधनही वाया जाते. इतर पोलीस ठाण्यात आरोपींना ठेवल्याने अलिबाग पोलीसांच्या तपास कार्यातही अडथळे निर्माण होत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

अलिबाग पोलीस ठाण्यात कारागृह बांधण्यासाठी गृह विभागाकडून निधी मंजूर झाला आहे. आवश्यक ती तांत्रिक पूर्तता केल्यानंतर कारागृह बांधण्याचे काम करण्यात येईल. सध्या अटक कोलोल्या आरोपींना मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात येत आहे.
– सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक, अलिबाग.