रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांची ग्वाही ; भुसावळसह खंडवा, बर्हाणपूर रेल्वे स्थानकांची पाहणी ; डिझेल इंजिन इलेक्ट्रीक करण्यासाठी प्रयत्न ; सेंट्रल रेल्वेतील दुसरा रेलनीर प्रकल्प भुसावळात
भुसावळ- भुसावळ-बडनेरा दरम्यान तिसरी रेल्वे लाईन टाकण्यात येणार असून लवकरच या कामाला मंजुरी मिळेल, असा आशावाद मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी व्यक्त करीत आगामी दोन वर्षात रेल्वेच्या सर्व मार्गांवर विद्युतीकरण होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परीषदेत दिली. शर्मा हे बुधवारी भुसावळ विभागाच्या दौर्यावर आले होते. सकाळी त्यांनी खंडवा तसेच बर्हाणपूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली तसेच दुपारी
12.30 वाजता त्यांचे रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर प्लॅटफार्म क्रमांक तीनवरील रेल्वे सुरक्षा बलाच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
बर्हाणपूरसह खंडवा रेल्वे स्थानकाची पाहणी
सरव्यवस्थापक शर्मा हे बुधवारी मुंबईहून हावडा मेलने खंडवा येथे दाखल झाले. तेथील रेल्वे स्थानकासह प्लॅटफार्मची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर काशी एक्सप्रेसने ते खंडवा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर तेथेही पाहणी करण्यात आली. सरव्यवस्थापकांसाठी विशेष सलून (कोच) असून त्याद्वारे त्यांनी तीनही ठिकाणी प्रवास केल्याचे सूत्रांनी सांगितले.
चाळीसगाव-धुळे मार्गासह सर्व मार्गाचे विद्युतीकरण होणार
सरव्यवस्थापक शर्मा म्हणाले की, गेल्या 70 वर्षापासून रेल्वेत न झालेली कामे आता जलदगतीने होत असल्याने खर्या अर्थाने विकास होत आहे. तिसर्या व चौथ्या रेल्वे लाईनमुळे अनेक गाड्या सुरू करता येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. चाळीसगाव-धुळे मार्गावर सध्या डिझेल इंजिन धावते मात्र आगामी दोन वर्षापर्यंत या मार्गावर विद्युतीकरण होणार असून सर्व रेल्वे मार्गावर विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
भुसावळ डीआरएम यादव यांचे कार्य गौरवास्पद
भुसावळ विभागात अत्यंत जोमाने कामे सुरू असून डीआरम आर.के.यादव यांचे कार्य सर्वोत्कृष्ट असल्याचे सरव्यवस्थापक म्हणाले. भुसावळातील अतिक्रमणाचा प्रश्न, यार्ड रीमोल्डींगचे दहा वर्षांपासून प्रलंबित असलेले काम तसेच जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्या रेल्वे लाईनचे काम शिवाय रेल्वे स्थानकांचा कायापालट आदी कामे यादव यांनी अत्यंत चांगल्या पद्धत्तीने केल्याचे शर्मा म्हणाले. भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी उत्कृष्ट असल्याचाही गौरव त्यांनी केला. रेल्वेत स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला असून प्रवाशांनी स्वच्छता ठेवल्यास घाण होणार नाही, असेही ते म्हणाले.
तिसर्या व चौथ्या रेल्वे लाईननंतर गाड्या वाढणार
भुसावळ विभाग हा मध्य रेल्वेचा सेंटर पॉईंट असून भुसावळ विभागातून तिसर्या व चौथ्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर गाड्या वाढवण्यात येतील शिवाय सर्वसाधारण गाड्यांची गती प्रति तास 110 किलोमीटर करण्यावर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. बडनेरा येथे वॅगन फॅक्टरी उभारली जात असून भुसावळात रेल्वेचा दुसरा रेलनीर प्रकल्पाचे काम एमआयडीसीत सुरू झाल्याचे ते म्हणाले. रेल्वे गाड्या उशीरा धावल्या चालतील मात्र अपघात नको, असेही ते म्हणाले.