मुंबई : सन 2018 पर्यंत 400 रेल्वे स्टेशन्स वायफायने सुसज्ज करण्याचे लक्ष्य आहे, हे साध्य करण्यासाठी रेल्वे, गुगल इंडिया,एमटीएनएल, बीएसएनएल आदी यंत्रणांनी सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. वर्षा निवासस्थानी रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याबाबतच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या बैठकीला माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्यासह रेल्वे, रेलटेल, एमटीएनएल आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औरंगाबादेतही होणार सुविधा
देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार औरंगाबाद स्टेशनवर सुद्धा वायफाय सुविधा देण्यात येणार असल्याचे घोषणा दिल्या आहेत. डिजिटल इंडिया योजनेंतर्गत देशातील महत्त्वाच्या 100 रेल्वे स्टेशनवर डिसेंबर 2016 पर्यंत रेलनेटच्या माध्यमातून वायफाय सुविधा दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यातील दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणामुळे वायफास सुरू होणार असून गुगल कंपनीचे साह्य मिळणार आहे. औरंगाबाद स्टेशनवरील प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी वायफाय सुविधा देण्याकरिता रेलनेट कंपनीच्या प्रतिनिधींकडून लवकरच स्थळपाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर वायफाय सुविधेबद्दल निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेले सिकंदराबाद रेल्वे स्टेशन व हैदराबादमधील सर्व स्टेशनवर वायफाय सुविधा देण्यात आली आहे. विजयवाडापासून ते सिकंदराबाद या मार्गावरील सर्व स्टेशन वायफायने जोडण्यात आले आहेत.
वायफायने सुसज्ज करण्याचे लक्ष्य लवकरच होणार
रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करण्यासाठी आणि 400 रेल्वे स्टेशन्स वायफायने सुसज्ज करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अंमलबजावणी समिती गठीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. भारतीय रेल्वेची रेलटेल कंपनी आणि गुगल इंडिया यांच्यात झालेल्या सांमजस्य करारानुसार गुगल इंडिया रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देत आहे. यावेळी गुगल इंडियाचे गुलझार आझाद यांनी वायफाय एकत्रिकरणाबाबत सादरीकरण करून माहिती दिली. बैठकीला पश्चिम रेल्वेचे रेलटेलचे वरिष्ठ संचालक व्ही.एस.ताहिम, महाव्यवस्थापक इंदीरा त्रिपाठी, अतिरिक्त महाव्यवस्थापक सुभाष चंद्रा आदी उपस्थित होते.