दोन वर्षीय बालिकेचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू

भुसावळ/जळगाव  : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. दिव्या आपसिंग डावर (रा.भिकनगाव, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

खेळताना बालिकेला लागला रेल्वेचा धक्का
सूत्रांच्या माहितीनुसार, आपसिंग डावर हे मूळचे भिकनगाव, जि.खरगोन मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. मजुरी काम करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. रेल्वेच्या कंत्राटी कामासाठी डावर कुटुंबीय हे जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात वास्तव्याला आहेत. गुरूवार, 13 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास डावर कुटूंबीय खेडी शिवारातील रेल्वे रूळाजवळ खडी टाकायचे काम करत होते. त्यांची दोन वर्षीय मुलगी दिव्या ही अचानक खेळता-खेळता रेल्वे रूळावर आली व खेळत असतांना बालिकेला धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिला लागलीच रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.