डरबन । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. सहा सामन्यांच्या या मालिकेत धोनीला दोन विश्वविक्रम करण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेमध्ये धोनी 10 हजार धावा आणि 400 विकेटचा विक्रम त्याच्या नावावर करु शकतो. 10 हजार धावा पूर्ण करायला धोनीला फक्त 102 धावांची आवश्यकता आहे. हा विक्रम केल्यानंतर अशी कामगिरी करणारा धोनी जगातला 12 वा आणि भारताचा चौथा फलंदाज बनेल. धोनीनं आत्तापर्यंत 312 सामन्यांमधील 268 डावांमध्ये 51.55च्या सरासरीने 9898 धावा बनवल्या आहेत. भारताकडून सचिन तेंडुलकर(18,426), सौरव गांगुली(11,363) आणि राहुल द्रविड(10,889) यांनी 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. धोनीने 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला तरी सर्वात जलद 10 हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होणार नाही. तेंडुलकरने 259, गांगुलीने 263, रिकी पॉटिंगने 266 डावांमध्ये 10 हजार धावा बनवल्या. धोनीने आत्तापर्यंत 268 डाव खेळले आहेत. तर जॅक कॅलिसने 272 डावांमध्ये 10 हजार धावा केल्या होत्या.
विकेट कीपिंग करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये 400 विकेट पूर्ण करण्यासाठी धोनीला आणखी दोन विकेट्सची आवश्यकता आहे. धोनीने यष्टीपाठी आत्तापर्यंत 293 झेल आणि 105 स्टम्पिंग असे मिळून 398 विकेट्स घेतल्या आहेत. कुमार संगकारा(472), ऍडम गिलख्रिस्ट(472) आणि मार्क बाऊचर(424) हे खेळाडू धोनीच्या पुढे आहेत. तसेच झेलांचे त्रिशतक पूर्ण करायला धोनीला आणखी सात झेलांची आवश्यकता आहे. हा विक्रमड करणारा धोनी चौथा विकेट कीपर बनेल. धोनीआधी गिलख्रिस्ट, बाऊचर आणि संगकाराच्या नावावर हा विक्रम आहे.
धोनीबरोबरच कोहलीकडेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. कोहलीने आत्तापर्यंत 202 सामन्यांमध्ये 98 षटकार ठोकले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 32 फलंदाजांनी 100 पेक्षा जास्त षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये धोनी(216), तेंडुलकर(192), गांगुली(190), रोहित शर्मा(163), युवराज सिंग(155), विरेंद्र सेहवाग(135) आणि सुरेश रैना(120) या सात भारतीयांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त षटकार मारले आहेत.