नंदुरबार। येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरातील दुरुस्तीच्या नावाखाली दोन वेळा बिल काढून नगरपालिकेने पावणे दोन कोटी रुपयांचा अपहार केला आहे, असा आरोप भाजपाचे डॉ.रविंद्र चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आता मी पुरावे दिले असून आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे प्रतोद नगरसेवक चारुदत्त कळवणकर, संगीता सोनवणे, आनंदा माळी आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रविंद्र चौधरी म्हणाले की, शिवाजी नाट्यमंदिरातील खुर्च्या बदलण्यासाठी व इतर कामांसाठी नगरपालिकेने २०१७ मध्ये पावणेदोन कोटी रुपये खर्च केले आहेत. २०१८ मध्ये पुन्हा तीच कामे दाखवून तसेच टेंडर काढून पावणे दोन कोटी रुपयांचा निधी नगरपालिकेने खर्च केल्याचे दाखवले आहे. या कामांचे दोनदा बिल एका एजन्सीला अदा करण्यात आले आहे. दोन कामाचे बिल काढल्याचे सिद्ध केल्यास मी राजीनामा देईल असे आव्हान आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले होते. ते आव्हान आम्ही स्वीकारले असून आता पुरावाच दिला आहे. त्यामुळे आमदार रघुवंशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही डॉक्टर चौधरी यांनी केली आहे, आमच्याकडे अजूनही असे काही मुद्दे असून त्यामुळे नगराध्यक्षांसह सत्ताधारी काँग्रेसचे सर्व नगरसेवक अपात्र ठरतील ,असा इशारा देखील रविंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.