दोन व्यापार्‍यांची सुवर्ण कारागिराकडून पावणे सहा लाखात फसवणूक

जळगाव : गेल्या 15 वर्षापासून सोने चांदीचे दागिने तयार करणार्‍या कारागिराने विश्वास संपादन जळगाव शहरातील मारोती पेठेतील दोन सोने चांदी दागिणे व्यापार्‍यांची पाच लाख 74 हजार रुपयांत फसवणूक केली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोने घेवून कारागीर पसार
शहरातील मारोती पेठ येथील रहिवासी सुशांत तारकनाथ भुतका (42) यांचा ते राहत असलेल्या परीसरात त्यांचा सोने-चांदीचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बापन मंटू कारक (28, रा.पश्चिम बंगाल) हा गेल्या 15 वर्षांपासून सोने-चांदीचे दागिणे बनविण्याचे काम करत होता. यादरम्यान त्याने विश्वास संपादन करुन घर बांधकामासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत कारखान्याचे मालक सुशांत भुतका यांच्याकडून दोन लाख 60 हजार रुपये घेतले. यादरम्यान त्याने दीपक संघवी यांच्याकडूनही 3 लाख 14 हजार रुपयांचे दागिणे बनिवण्यासाठी घेतले होते. एके दिवशी बापन कारक हा दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून आला नाही तसेच त्याच्याशी संपर्कही केला मात्र संपर्कही झाला नाही.

शनीपेठ पोलिसात गुन्हा
सुशांत भुतका यांच्याकडून घेतलेले 2 लाख 60 हजार रुपये व दिपक संघवी यांचे 3 लाख 14 हजार रुपयांचे दागिणे परत न करता दोघां व्यापार्‍यांची एकूण 5 लाख 74 हजार रुपयांत बापन कारक याने फसवणूक केली. पैसे तसेच दागिणे परत मिळत नसल्याने तब्ब्ल दोन महिन्यानंतर सुशांत भुतका यांनी बापन कारक याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.