महापालिका शिक्षण अधिकार्यांकडून छळ?
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या शिक्षण अधिकार्यांनी विनाकारण वेतन रखडविल्याचा आरोप करत चिंचवड, काळेवाडी येथील खासगी शाळेतील दोन शिक्षिकांनी आत्महदनाचा इशारा दिला आहे. प्रशासन अधिकारी व वेतन अधिक्षकांनी 30 एप्रिलपर्यंत वेतन अदा करावे, अन्यथा शिक्षण मंडळ कार्यालय अथवा जिल्हा परिषदेच्या वेतन अधीक्षकांच्या कार्यालयात आत्मदहन करण्यात येईल. आमचे काही बरेवाईट झाल्यास त्याला अधिकारी व लिपिक जबाबदार राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबर 2017 पासून विनावेतन
याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तत्कालीन शिक्षण संचालक यांचा आदेश डावलून अनधिकृत संघटनेच्या दबावाला बळी पडून आमची बाजू विचारात न घेता अथवा आमची कागदपत्रे व पुरावे उजेडात न आणता शाळेवर प्रशासक नियुक्तीची शिफारस केली. ऑक्टोबर 2017 पासून आजतागायत आमचे वेतन झालेले नाही. त्यामुळे आम्ही आर्थिक विवंचनेत असून याबाबत वेतन अधिक्षकांकडे वारंवार विचारणा करुन देखील आमची आर्थिक कुचंबणा व्हावी, या कुटील हेतूने वेतन अडवून धरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संघटनेच्या दबावाखाली अधिकारी
पालिकेचे शिक्षण अधिकारी बजरंग आवारी यांनी कोणतीही शहानिशा न करता शाळा, संस्था यांच्याकडे विचारणा न करता संघटनेच्या दबावाला बळी पडून आमच्या विरुद्धचे चुकीचे अहवाल शिक्षण अधिकारी व उपसंचालकांना पाठविले आहेत. आमचा काहीही दोष नसताना व त्यांचा भ्रष्ट कारभार उघडकीस येईल. या भीतीने आमच्यावर कारवाई करण्याची शिफारस आवारी यांनी केली आहे. त्यांनी संस्थेतील काही अनधिकृत पदाधिकार्यांना हाताशी धरुन निलंबित शिक्षकांना पुन्हा सेवेत घ्या म्हणून आमच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. वारंवार आम्हाला कारवाई करण्याची भीती दाखविली जात आहे, असा आरोपही त्या दोन शिक्षिकांनी केला आहे.
जगणे मुश्किल
आजपर्यंत आम्ही खूप त्रास सहन केला आहे. परंतु, आता आमचे जगणे मुश्किल झाल्यामुळे या अधिकार्यांमुळे टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. प्रशासन अधिकारी व वेतन अधीक्षकांनी 30 एप्रिलपर्यंत आमचे वेतन अदा न केल्यास 1 मे नंतर पालिकेतील शिक्षण मंडळ कार्यालय अथवा पुणे जिल्हा परिषदेच्या वेतन अधिक्षक यांच्या कार्यलयात आत्महदन करण्यात येईल. आमचे काही बरेवाईट झाल्यास त्याला अधिकारी व लिपिक जबाबदर राहतील, असाही इशाराही त्यांनी दिला आहे.
त्या शाळेवर राजपत्रित अधिकारी प्रशासक म्हणून नेमण्यात आला आहे. आम्ही त्यांचे वेतन अडविले नाही.
-बजरंग आवारी, शिक्षण अधिकारी