जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता कायम; ३४ विरुध्द ३१ मताच्या फरकाने भाजपने बहुमत जिंकले
जळगाव: राज्याच्या धर्तीवर मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दोन सदस्य फुटल्याने जळगाव जिल्हा परिषदेवर सत्ता बदल करण्याचे महाविकास आघाडीचे स्वप्न भंगले आहे. शुक्रवारी 3 रोजी जि.प.अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जि.प.सदस्या मीना रामेश पाटील आणि काँग्रेसचे विद्यमान सभापती दिलीप युवराज पाटील यांनी भाजपला मतदान केल्याने भाजपने जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम राखली. अध्यक्षपदी भाजपच्या रावेर तालुक्यातील ऐनपूर-खिरवड गटाच्या रंजना प्रल्हाद पाटील तर उपाध्यक्षपदी नशिराबाद-भादली गटाचे लालचंद प्रभाकर पाटील यांची वर्णी लागली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी एकूण 65 सदस्य हजर होते. त्यापैकी 34 सदस्यांनी भाजपच्या तर 31 सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. आवाजी मतदानाने ही प्रक्रिया घेण्यात आली. भाजपच्या नंदा दिलीप सपकाळे ह्या गैरहजर होत्या.
भाजपात अंतर्गत नाराजी
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांना संधी न मिळाल्याने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत नाराजी पसरली आहे. पल्लवी सावकारे, मधुकर काटे यांच्यासहित अनेक सदस्य इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या टर्ममध्ये देखील पक्षाच्या निष्ठावंताना डावलण्यात आले होते. यावेळी निष्ठावंत सदस्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र यावेळी निष्ठावंत सदस्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. काही सदस्यांनी आपली नाराजी माध्यम प्रतिनिधींसमोर बोलून देखील दाखविली. आता सभापती पदासाठी तरी संधी मिळेल अशी अपेक्षा नाराज सदस्यांनी व्यक्त केली आहे.
ऐनवेळी सदस्याच्या अपत्रातेला स्थगिती
जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने राष्ट्रवादीचे आत्माराम कोळी आणि शिवसेनेच्या सरला कोळी हे अपात्र झाले होते. त्यांना मतदानाचे अधिकार नव्हते. मात्र शुक्रवारी ऐनवेळी निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याच्या अर्ध्यातासापूर्वी कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सरला पाटील यांनी मतदानात सहभाग घेत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. कोर्टाने दोन्ही पक्षाला समसमान मते पडली अशी अटीतटीचा प्रसंग निर्माण झाल्यास अपात्र झालेल्या सरला कोळी यांना मतदान करू न देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र 34 विरुद्ध 30 अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सरला कोळी यांना मतदानाचा अधिकार मिळाला.
कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्याला आणले पकडून
काँग्रेसचे विद्यमान सभापती दिलीप युवराज पाटील आणि राष्ट्रवादीच्या मिना पाटील यांनी पक्षाचा व्हीप मोडत भाजपला मतदान केले. हे दोन्ही सदस्य सुरुवातीपासूनच भाजपसोबत होते. भाजप सदस्यांसोबत हे दोन्ही सहलीवर होते. मतदानावेळी भाजपचे सर्व सदस्य एका वाहनातून जि.प.त दाखल झाले. यावेळी भाजपच्या सदस्यांनी दिलीप पाटील आणि मिना पाटील यांचा हात धरून हाताची साखळी करत सभागृहात आणले.
त्या सदस्यावर कारवाई करणार- अॅड. रवींद्र पाटी
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला असला तरी संख्याबळ हे कायम राहिले आहे. आमच्या सदस्याने व्हीप पाळला नाही. त्यामुळे जि.प अध्यक्ष निवडणुकीत फुटलेल्या त्या सदस्यावर अपात्रतेची कारवाई होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दिली.
व्हीप मोडणार्यांवर होणार कारवाई
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने व्हीप जाहीर केला होता. महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश व्हीपमध्ये देण्यात आले होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांकडून व्हीप मोडण्यात आला आहे. व्हीप मोडल्याप्रकरणी या सदस्यांवर कारवाई होईल असे पक्ष नेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता पक्ष या सदस्यांवर काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे. 2017 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी भाजपला पाठींबा दिला होता. त्यामुळे कारवाई झाली नाही. मात्र यावेळी काँग्रेसने महाविकास आघाडीसोबत राहण्याचे जाहीर केले होते. मात्र सदस्यांनी व्हीप मोडला आहे.
खडसे गटाला झुकतेमाप
सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपात नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडदेखील केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत त्यांच्या गटाला झुकतेमाप देण्यात आले आहे. अध्यक्षा खडसे यांच्या विधानसभा मतदार संघातील आहेत. तर उपाध्यक्ष हे खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. भाजपने जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत त्यांना झुकतेमाप देवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
संख्याबळ नसतांनाही एकसंघ राहून लढलो!
आमच्याकडे संख्याबळ नव्हते तरीही आम्ही प्रमाणीकपणे एकसंघ राहून लढलो. आमचा एकही सदस्य प्रलोभनाला बळी पडला नाही. मात्र, भाजपाच्या एक महिला सदस्या गैरहजर राहिल्या. मोडतोड करून मिळालेला विजय साजरा करतांना भाजपाने एक सदस्य गैरहजर का राहिला याचे आत्मपरिक्षण करावे असा सल्ला महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला दिला. विजयासाठीचे आकडे आमच्याकडे नव्हतेच. अशा परिस्थितीत जोडतोडचे राजकारण करण्यापेक्षा आम्ही प्रमाणिक लढलो. आमचे सर्व सदस्य एकसंघ राहिल्याचे ना.गुलाबराव पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीने उमेदवार बदलला
शिवसेनेचे संपर्क प्रमुख डॉ.संजय सावंत, नवनियुक्त कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या संयुक्त बैठकीत महाविकास आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी जयश्री अनिल पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत एकमत झाले होते. मात्र अध्यक्षपदाचा अर्ज भरताना महाविकास आघाडीने ऐनवेळी अध्यक्षपदाचा उमेदवार बदलला. जयश्री पाटील यांच्या जागी शिवसेनेच्या रेखा दीपक राजपूत यांचा अर्ज भरण्यात आला. शिवसेनेने सगळे सदस्य एकसंघ ठेवले मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीला सदस्य एकत्र ठेवता आले नसल्याचा आरोप देखील शिवसेनेच्या नेत्यांनी केले. राष्ट्रवादी, काँग्रेसने सदस्य एकसंघ ठेवले असते तर जि.प.वरील भाजपची सत्ता खालसा झाली असती असेही शिवसेना नेत्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या पदरी निराशाच
2017 ला काँग्रेसच्या सर्वच जि.प.सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन भाजपला पाठींबा दिला होता. यावेळी पक्षाच्या आदेशाचे पालन करत काँग्रेसच्या चारपैकी 3 सदस्य महाविकास आघाडीसोबत राहिले. मात्र दोन सदस्य फुटल्याने महाविकास आघाडीचा प्रयत्न अपयशी ठरला. काँग्रेसने मागच्यावेळी भाजपला पाठींबा देत एक सभापतीपद मिळविले होते. आताही भाजपसोबत राहिले असते तर पुन्हा एकाला सभापतीपदाची संधी मिळाली असती मात्र ही संधी आता हुकल्याने काँग्रेसच्या पदरी निराशा आली आहे. भाजपसोबत राहिल्यास प्रभाकर सोनवणे किंवा अरुणा रमेश पाटील यांना सभापतीपद मिळाले असते पण ही संधी हुकली आहे.
पदाला न्याय देणार
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा मिनी मुख्यमंत्री म्हणून ओळखला जात असतो. ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद कार्यरत आहे. पक्षाने मला जी संधी दिली आहे, त्या संधीचे सोन करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. रंजना प्रल्हाद पाटील, नवनियुक्त अध्यक्षा.
प्रलंबित कामे मार्गी लावणार
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात अनेक कामे झालीत. काही कामे राहिली असतील तर त्यांना तातडीने पूर्ण करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. सर्वपक्षीय सदस्यांना विश्वासात घेऊन काम करेल. लालचंद पाटील ,नवनियुक्त उपाध्यक्ष.