दोन सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या ठरावावरुन ग.स.च्या सभेत गोंधळाची परंपरा कायम

0

जळगाव– सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.ची 110 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली.संस्थेची सोशल मीडियावर बदनामी करणारे सभासद रावसाहेब पाटील आणि योगेश सनेर यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या ठरावावरुन चांगलाच गोंधळ झाला.या गोंधळातच सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी उपस्थित काही सभासदांनी विरोध केल्यामुळे व घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे सभेतील गोंधळाची परंपरा कायम राहिली.
नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात ग.स.चे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष शामकांत भदाणे, विलास नेरकर, तुकाराम बोरोले, विश्‍वास सुर्यवंशी,अनिल गायकवाड, सुभाष देशमुख जाधव, सुनिल पाटील, नथ्थू पाटील, सुनिल अमृत पाटील, यशवंत सपकाळे, संजय पाटील, दिलीप चांगरे, उदय पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी श्रध्दांजली वाहण्यात आली.त्यानंतर अहवाल छपाई न केल्यामुळे 11 लाखांची संस्थेची बचत झाल्याने डा ॅ.मिलिंद बागुल यांनी अंभिनंदनाचा ठराव मांडला.
ठेवी परत केल्याने नक्यावर परिणाम
शासनाने 100 कोटींच्या ठेवी परत केल्याने नफ्यावर परिणाम झाला आहे.त्यामुळे यंदा सभासदांना 7 टक्केे लाभांश दिला आहे.पुढच्या वर्षी 10 टक्के लाभांश देणार अशी भू मिका अध्यक्ष मनोज पाटील यांनी मांडली.संस्थेच्या पैशांची बचत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले. संस्थेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहे.व्याजाची आकारणी सहा महिन्याऐवजी तिमाही करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष पाटील यांनी केली.
दोन सभासदांचे सदस्यत्व रद्दचा ठराव मंजूर
संस्थेचे सभासद रावसाहेब पाटील आणि योगेश सनेर यांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 35 नुसार सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी काही उपस्थित सभासदांनी विरोध करत घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळ झाला होता.दरम्यान विषय पत्रिकेवरील सर्व 12 विषयांना गोंधळातच मंजुरी देवून दहा मिनिटात सभा आटोपली.यावेळी काही सभासदांनी ठराव क्रमांक 12 नांमजूर असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या.
गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणार
संस्थेत मोठयाप्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणार असा इशारा रावसाहेब पाटील यांनी दिला.सत्ताधार्‍यांना जेलमध्ये टाकणारच त्यासाठी न्यायालयीन लढा लढणार असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सभा संपल्यानंतर द्वारसभेत सांगितले.
सहकार गट तटस्थ
संस्थेचे सभासद रावसाहेब पाटील आणि योगेश सनेर यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या भूमिकेवर सहकार गट तटस्थ असल्याचे उदय पाटील यांनी सांगतले.सत्ताधार्‍यांची हुकु मशाही सुरु असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
सभासदांना 600 रुपये भत्ता
ग.स.च्या सभेसाठी उपस्थित सभासदांना प्रत्येकी 600 रुपयाचा भत्ता देण्यात आला.तालुकानिहाय भत्ता घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.भत्ता घेण्यासाठी सभासदांच्या रांगा लागल्या होत्या.परिसरात मिनी बाजार भरला होता.वेगवेगळे स्टॉल थाटली होती.गर्दीमुळे यात्रेचे स्वरुप आले होते.पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.