नवी दिल्ली : दोन हजार रूपयांच्या नव्या नोटा हळूहळू चलनातून गायब होऊ लागल्या आहेत. एटीएममधूनही पाचशेच्या नोटाच ग्राहकांना मोठ्याप्रमाणात मिळत आहेत. 2 हजार रुपयांच्या नोटांची कमतरता भासू लागल्याने बँका आणि एटीएममध्ये पैसे भरण्याची सुविधा पुरवणार्या कंपन्याही हैराण झाल्या आहेत. दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण कमी होण्याबाबात भारतीय रिझर्व बँकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
एसबीआयसुध्दा त्रस्त
आरबीआयकडून 500 रूपयांच्या नोटांचा मोठ्याप्रमाणात पुरवठा केला जात असल्याचे स्टेट बँकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) व्यास यांनी म्हटले आहे. सुरूवातीला पुरवण्यात आलेल्या 2 हजारच्या नोटाच सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. देशात एकूण 2.2 लाख एटीएम आहेत. त्यापैकी 58 हजार एटीएम हे एसबीआयचे आहेत. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रूपयांच्या नव्या नोटा देण्यासाठीची रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया एसबीआयने सर्वात वेगाने पूर्ण केली होती. परंतु, आता बँकेला 2 हजार रूपयांच्या नोटांच्या तुटवड्यामुळे एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत.