दोन हजारच्या नोटा दोन नंबरवाल्यांसाठीच!

0

पुणे : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर करण्यात आलेल्या अयोग्य नियोजनामुळे स्वत:चे पैसे बँकेतून काढता येत नसल्याने शेतकरीवर्गासह सामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे. सहकारक्षेत्रही नोटाबंदीमुळे संकटात सापडले आहे. केंद्र सरकारने पाचशे-हजारच्या नोटा बंद केल्यानंतर दोन हजारांच्या नोटा काढून दोन नंबरवाल्यांचीच जास्त सोय केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाघोली, पुणे येथील रामराज्य सहकारी बँकेच्या सहाव्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी केला.

सरकारने सामान्यांना वेठीस धरले..
या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार बाबुराव पाचर्णे, विधान परिषदेचे आमदार शरदराव रणपिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, शांतारामबापू कटके, विजय जाचक, रामभाऊ दाभाडे, राजेंद्र सातव, दादा सातव, गणेश कुटे, गणेश सातव, बाळासाहेब सातव आदि उपस्थित होते. नोटाबंदीचा निर्णय होऊन 45 दिवस उलटले. पंचेचाळीस दिवसामध्ये कितीतरी परिपत्रके काढण्यात आली. त्यामुळे रोज नवे निर्णय काढून सामन्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. दोन हजाराची नोट घेवून अनेकजण ती सुट्टी करण्यासाठी बाजारात हिंडताना दिसत आहेत. जेवढ्या नोटांची मागणी आहे, त्या छापल्याच जाऊ शकत नसल्याने सामान्य नागरिक व शेतकर्‍यांची आर्थिक नड भागू शकत नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बँक अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.