दोन हजार रोपांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत

0
उन्नती सोशल फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम
सांगवी : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्यावतीने शिवार चौक आणि खेळाचे मैदान याठिकाणी विविध जातीच्या सुमारे दोन हजार रोपांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, पी.के.स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, शंकर चोंधे, राजेंद्र जयस्वाल, विनोद भल्ला, विकास काटे, सुनीता बच्चे, मोहिनी मेटे, सुवर्णा काटे, कांचन काटे, मीनाक्षी राजू देवतारे, प्रकाशनगरकर, संभाजी कुंजीर, अशोक काटे, सतीश काटे, संजय डांगे, सागर बिरारी, आनंद योगा हास्यक्लब, नवचैतन्य हास्यपरिवार यांच्यासह विविध सोसायटीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.
वृक्ष संवर्धनास प्राधान्य द्यावे
यावेळी संजय भिसे म्हणाले की, दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास होत असल्याने तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करणे गरजेचे आहे. शहरात वृक्षलागवड आणि वृक्ष संवर्धनास प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच अधिकाधिक झाडे लागावीत. यासाठी सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. जगन्नाथ काटे म्हणाले की, सध्या विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे झाडांची संख्या कमी झाली असून निसर्गाचा समतोल बिगडत आहे. त्यामुळे एक व्यक्ती एक झाड हि संगल्पना राबवून प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. तसेच प्रत्येकांनी आपल्या मुलाप्रमाणे झाडांचे संगोपन करावे. आज वाटलेल्या झाडांची आम्ही काही महिन्यानंतर पाहणी करणार असून ज्यांनी झाडाचे चांगले संगोपन केले आहे अश्या नागरिकांना मी योग्य बक्षीस देणार आहे.